Pune : भाई आणि नाना पुन्हा एकत्र ; राजकीय चर्चेंला उधाण

एमपीसी न्यूज – राज्यसभेचे खासदार संजय काकडे हे पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदार संघातील संपर्क वाढविला आहे. संजय काकडे हे भाजपमधून इच्छुक असले तरी त्यांचा सर्वपक्षीय सबंध सर्वश्रुत आहे. त्यातच एकेकाळी पुण्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असणारे सुरेश कलमाडी यांच्याशी संजय काकडे यांचे असलेले सबंध हे काही लपून राहिलेले नाहीत. अशातच संजय काकडे आणि सुरेश कलमाडी यांनी एकत्र पुण्यातील बाबू गेनू गणेश मंडळात गणरायाचे दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी खडकवासला, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. या भागातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. या भेटी देत असतांना शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब मारणे अध्यक्ष असलेल्या बाबू गेनू गणेश मंडळाला संजय काकडे यांनी भेट दिली यावेळी तेथे सुरेश कलमाडी देखील उपस्थित होते. ही भेट राजकीय नसून योगायोगाने झाली असल्याचे जरी संजय काकडे सांगत असले तरी या भेटीने अनेक राजकीय पंडितांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत.

खासदार काकडे यांनी रविवारपासून शहरातील बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सहकारनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, धनकवडी, पर्वती, टिळक रोड, सदाशिव पेठ व नवी पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, शनिवार, मंडई, कसबा, बुधवार, गणेश, नाना पेठ आदी भागांतील बहुतांश मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत खडकवासला, पर्वती व कसबा मतदार संघ खासदार काकडे यांनी पिंजून काढला.

गणेश भक्तांमधील उत्साह, गणेश मंडळांकडून केलेली सजावट, आरास आणि पोलीस व स्वयंसेवकांनी राखलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे गणेशोत्सवाचा उत्तम पद्धतीने आनंद नागरिकांना घेता येत आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव. या काळात सगळीकडे आनंद व समाधान असते. यावेळी गणेशोत्सवाचे हे उत्साही रुप पाहिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. तसेच, सर्वांना सुखी आणि माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांवरील संकट दूर करून त्यांच्या जीवनातही सुखाचे दिवस येऊ देत, अशी प्रार्थनाही त्यांनी गणराया चरणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.