Pune : नव्या जागेवर रंगणार ‘सवाई’ चा दिमाखदार सोहळा

एमपीसी न्यूज – आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी 12 ते 16 डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे 66 वे वर्ष असून यावर्षीच्या महोत्सवात कला प्रस्तुती करणा-या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, पृथ्वी एडिफिसचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अभय केले, आशा पब्लिसिटीचे चंद्रकांत कुडाळ, बुलडाणा अर्बनचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक शिरीष देशपांडे या वेळी उपस्थित होते.

यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल ३१ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचा देखील सहभाग असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

महोत्सवाच्या जागा बदलाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले की, यावर्षी महोत्सव हा नवीन जागेत होणार आहे त्यामुळे आम्हालाही औत्सुक्य आहे. शास्त्रीय संगीताचे पावित्र्य जपत केलेल्या नवनवीन प्रयोगांना रसिक श्रोत्यांनी आतापर्यंत भरघोस प्रतिसाद आणि दाद दिली आहे. त्यामुळे या वर्षीच्या महोत्सवाचा बदल स्वीकारत पुणेकर आणि देशविदेशातून येणारे रसिक श्रोते यावर्षीही सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाठीशी उभे राहतील असा आमचा विश्वास आहे.

महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे

बुधवार दि. 12 डिसेंबर
औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादन
ग्वाल्हेर- आग्रा घराण्याच्या रवींद्र परचुरे यांचे गायन
बसंत काब्रा यांचे सरोदवादन
प्रसाद खापर्डे यांचे गायन
ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांचे वादन

गुरुवार दि. 13 डिसेंबर
बनारस घराण्याच्या डॉ. रिता देव यांचे गायन
पुण्याचे युवा गायक सौरभ साळुंखे यांचे गायन
संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा यांचे संतूर वादन
सुप्रसिद्ध गायक पं. अजय पोहनकर यांचे गायन

शुक्रवार दि. 14 डिसेंबर 
जयपूर घराण्याच्या अपर्णा पणशीकर यांचे गायन
पंजाबच्या रागी बलवंत सिंग यांचे गायन
मिलिंद रायकर व त्यांचे पुत्र यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन
ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर

शनिवार दि. 15 डिसेंबर
बंगळुरूचे दत्तात्रय वेलणकर यांचे गायन
गायिका सावनी शेंडे यांचे गायन
बासरीवादक विवेक सोनार यांचे बासरीवादन
पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन
आग्रा जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित यांचे गायन
इंदौरचे ज्येष्ठ गायक पं. गोस्वामी गोकुलोत्सव महाराज यांचे गायन
इमदादखानी घराण्याचे उस्ताद शाहीद परवेज यांचे सतार वादन

रविवार दि. 16 डिसेंबर
किराणा घराण्याचे गायकबंधू अर्शद अली व अमजद अली यांचे सहगायन
अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे सहगायन
प्रसिद्ध वीणावदक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिन वादक इंद्रदीप घोष यांचे सहवादन
गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन
सेनिया घराण्याचे सतारवादक प्रतिक चौधरी यांचे सतारवादन
शास्वती सेन यांचे कथ्थक सादरीकरण
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.