Pune : निसर्गप्रेम जागृत करण्याची गरज : रवींद्र धारिया

सिनर्जी संवाद’उपक्रमात रवींद्र धारिया यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- ‘मानवाची निसर्गरचनेत ढवळाढवळ करण्याची वृत्ती ही वाढत्या नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत आहे. निसर्गरचनेत ढवळाढवळ न करता प्रत्येकातील निसर्गप्रेम जागृत करण्यात व निसर्गसंपदा जपण्यात पुढाकार घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले.

‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ आयोजित ‘सिनर्जी संवाद’ या उपक्रमात ते ‘पश्‍चिम घाटातील वनराई वाढविण्याचे प्रयत्न’ या विषयावरील संवाद कार्यक्रमात बोलत होते. धारिया यांच्या या क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’चे संचालक राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मंदार देवगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रवींद्र धारिया म्हणाले, ‘पडीक जमिनींचा विकास, जलसंधारण, वृक्षारोपण कार्यक्रमांबरोबर शेतीसुधार कार्यक्रमातही ‘वनराई’ने काम केले. गावातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले. आता ‘वनराई’मार्फत ग्रामीण भागातील उपक्रमांबरोबर पुण्यात ‘प्लास्टिक संकलन’, ‘विषमुक्त शेती अन्नदाता अभियान’, ‘खिळेमुक्त झाडे’, ‘आळेयुक्त झाडे,’अशा उपक्रमाना वनराई सहकार्य करते.

निसर्गाची निचरा होणारी व्यवस्था, नदी, नाले, टेकड्या आपण बदलायला गेलो की, त्या संरचनेत बिघाड होतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून प्रत्येकातील निसर्गप्रेम जागृत करून रचनेतील ढवळाढवळ थांबवली पाहिजे.

गणेश जाधव यांनी स्वागत केले, दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे आणि मंदार देवगावकर यांनी पर्यावरणपूरक निसर्ग पर्यटन प्रकल्पांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.