Pune : कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांना ठेकेदारांकडून तीन-तीन महिने पगार दिला जात नाही. या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने ठेकेदारी पद्धतीने रस्त्यांची साफसफाई व स्वच्छता केली जाते. समाविष्ट गावांमध्ये आणि उपनगरांतील प्रभागांत या प्रकारच्या ठेकेदारांकडून कर्मचारी पुरविले जातात. शहरातील विविध प्रकारच्या स्मशानभूमी, महापालिकेच्या इमारती, उद्यान, दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये आणि खेळाचे मैदान सर्वच महापालिकेच्या वास्तूमध्ये ठेकेदारी पध्दतीने सुरक्षारक्षक नेमले आहेत.

अशा ठेकेदारी पद्धतिने नेमलेल्या सफाई कामगार व सुरक्षारक्षकांना गेली तीन महिन्यांपासून मासिक वेतन दिले गेले नाही. हातावरच पोट असणारे हे कर्मचारी आहेत. पुणे शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिस्थितीत सुध्दा हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित ठेकेदारांकडून मास्क, हॅन्ड ग्लोज, डोक्यावरील कॅप, सॅनिटायजर, बूट अशा आवश्यक वस्तू पुरविल्या जात नसल्याचे दीपाली धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

तीन तीन महिने पगार दिला जात नसल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. वारंवार तक्रार करून कधीतरी एखाद्या महिन्याचा पगार दिला जातो. परत ‘येरे माझ्या मागल्या…’ अशीच अवस्था या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.