Pune : सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करा : मंजुषा नागपुरे

एमपीसी न्यूज – राजाराम पूल, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता येथे 50-60 जण टेम्पोमध्ये कुठलेही डिस्टनसिंगचे नियम न पाळता, मास्क न घालता याठिकाणी भाजी विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.

दरम्यान, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पुण्यात कर्फ्यु असताना हे भाजीवाले इथे आलेच कसे, असा सवाल भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याबद्दल प्रशासनाला सांगून सुद्धा कारवाई का झाली नाही? यामध्ये एकाला देखील कोरोनाची लागण झाली असल्यास आणि सिंहगड रस्ता व एकूणच शहरात याचा फैलाव झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रस्ता अडवून सर्रास भाजी विक्री सुरू होती, अम्ब्युलन्सला वाट देखील मिळू शकली नसती, या परिस्थिती ला जबाबदार कोण, ठिकठिकाणी पोलिसांचे चेक पॉईंट असताना हे भाजी विक्रेते आलेच कसे? असे अनेक सवालही नागपुरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केले आहे.

सिंहगड रस्त्यावरील अनेक छोटे विक्रेते भाजी खरेदी करून ठिकठिकाणी विक्रीस नेतात. राजाराम पुलावर या भाजीवाल्यांनी अत्यंत घाण व कचरा केला आहे असे दिसून आले. त्यामुळे ताबडतोब संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पुणे शहरात वाढत असून, त्याचा अटकाव करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर, लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, असेही नागपुरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.