Pune : स्वाईन फ्लू : नागरिकांनी काळजी घेण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळल्याने पुणे शहरात सुद्धा महापालिकेच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीचा पूर्ण साठा महापालिकेच्या सर्वच दवाखान्यात उपलब्ध असून अतिजोखमीच्या रुग्णांना मोफत लसीकरण महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. तर ताप , सर्दी, खोकला, घशात खवखव होत असेल तर अंगावर न काढता जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात त्वरित दाखवून घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी संजीव वावरे यांनी केले आहे.

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा सक्रीय झाला आहे. पुणे शहरात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला नसला तरी सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.