Pune: कोरोनाला गांभीर्याने घ्या, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे आवाहन

Pune: Take Corona seriously, IMA president Dr. Avinash Bhondwe Appeal to citizens

एमपीसी न्यूज- सर्वत्र विविध माध्यमांतून कोरोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करीत कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आयोजित कोरोनाविषयक जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार नेमका कसा होतो, कोरोनाची लागण झाल्यानंतरची लक्षणे, कोरोनाची लागण कोणाला जास्त होण्याची शक्यता आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यायची, ते उपायसुद्धा सांगितले.

विशेषतः नोकरदार व्यक्तींनी कामावर असताना कशी काळजी घ्यायची हे सांगत मास्क घालणे, मास्कची स्वच्छता, सामाजिक अंतर पाळणे, वारंवार व्यवस्थितपणे हात स्वच्छ धुणे व दैनंदिन वापरात हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे आदींबाबतही सविस्तर विवेचन केले.

कोरोनावर येणारी संभाव्य लस नजीकच्या भविष्यात तरी वापरात येणे हे शक्य नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदारीने सुरक्षेचे प्रतिबंधात्मक उपाय आवर्जून अंमलात आणावे, सकस आणि संतुलित आहार घ्यावा, व्यसनांपासून दूर राहावे व कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता सजग राहावे असेही डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे नियम पाळत या कार्यशाळेत ‘यशस्वी’ संस्थेच्या मुख्यालयातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेची ध्वनिचित्रफीत ‘यशस्वी’ संस्थेच्या देशभरातील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्याना पाठविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले. संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.