Pune : शहरातील सील भागात कठोर पावले उचला; महापौर मुरलीधर मोहोळ यांची पुणे पोलिसांना विनंती

शहराच्या पूर्व भागात होणार कठोर अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात आलेल्या भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग आणि ढोले पाटील रोड या तिन्ही क्षेत्रिय कार्यालय परिसरात रुग्णांची संख्या वाढतच असून याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याशी चर्चा केली. याबाबत कठोर पावले उचलण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

शहरातील काही भाग सील करण्याचा निर्णय सहा एप्रिल रोजी घेतला होता. त्यासाठी कोरोनाबाधितांच्या डिजिटल मॅपिंगचा अभ्यास केला आणि त्याद्वारे बाधीत परिसर सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या इतर भागांत करोनाचा होणारा प्रसार आणि संसर्ग रोखण्यात आपल्याला तुर्त तरी यश आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते आहे. मात्र, सील केलेल्या भागातील बाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.

याच पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी तातडीने कठोर पावले उचलण्याची सूचना पुणे पोलिसांना केली आहे. यावेळी पोलीस सह-आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हेही उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ’13 एप्रिलपर्यंतची आकडेवारी पाहिली तरी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ७८ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयार्तगत ४१ तर ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयार्तगत ३९ रुग्ण आहेत. याचा विचार केला तर शहरातील एकूण २८६ रुग्णांपैकी १५८ हे शहराच्या मध्यवस्तीतील या तीन क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येतात. शिवाय वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, हडपसर-मुंढवा आणि धनकवडी या क्षेत्रिय कार्यालयार्तगत ६५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहराच्या सात क्षेत्रिय कार्यालयांतगत २२३ रुग्ण आढळले आहेत.’

‘बाधीत परिसर सील केले असले तरी या ठिकाणी रुग्ण संख्या आटोक्यात येणे आवश्यक बनले आहे. नागरिकांकडून परिणामकारक सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी आवश्यक ती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

कठोर पावले उचलताना महापालिकेकडून पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेणे आवश्यक बनले आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.