Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या सूचना गांभीर्याने घ्या : महापौर

Take member's suggestions seriously in the background of corona crisis: Mayor

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात सभासदांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे. त्यामुळे ते वास्तवाला धरून बोलतात. सभासदांच्या ज्या काही सूचना आहेत, त्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

मंगळवारी पुणे महापालिकेची ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यामध्ये नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हडपसर मतदारसंघात 2 हजार 200 रुग्ण वाढले आहेत. येथे 3 क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, या केंद्रातील बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पाणी नाही. आरोग्य प्रामुख्याने एकदाही भेट दिली नाही. राज्य शासनाने नियुक्त केलेले आयएएस अधिकारी सुद्धा आले नाहीत, अशा तक्रारी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केल्या.

या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ससाणे यांनी अंगात फ्लेक्स घालून ‘हडपसर महापालिकेत आहे का ?’, असा सवाल उपस्थित केला. तर ही गंभीर बाब असल्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्यावर राजकारण करू नका, महापौर मार्ग काढतील, असे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले.

ऑगस्टमध्ये 4 किंवा 5 तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा घेऊ. तसेच आता लगेच महापौर दालनात हडपसरच्या समस्या संदर्भात चर्चा करू, असे आश्वासन महापौरांनी दिले.

कोरोनाच्या संकट काळात अजूनही रुग्णालये लोकांकडून पैसे घेतात. त्यावर आपण काय कारवाई करणार आहात, असा सवाल नगरसेवक अविनाश बागवे यांनी उपस्थित केला.

रुग्णांकडून 6 ते 9 हजार रुपये हॉस्पिटल घेतात, ते परिपत्रक रद्द करावे लागेल, खाजगी हॉस्पिटलची मनमानी सुरू आहे. राज्य शासनाने दर ठरवून दिले आहेत, असे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

तर, नागरिकांशी नगरसेवकांचा सातत्याने संपर्क असतो. आजही अपूर्ण यंत्रणा आहे. क्वारांटाईन सेंटर, बिल, बेडस याची गंभीरपणे दखल घ्या. ऑगस्ट महिन्यात शासनाच्या आदेशानुसार सविस्तर चर्चा करून सभासदांना संधी देऊ, असे आश्वासन महापौरांनी दिले.

पुणे शहरात कोरोना झपाट्याने वाढत आहेत. नगरसेवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही महापौरांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.