Pune : पारधी समाजातील लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा : प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक ‘वंचित’चे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिले आहे.

ही घटना बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात घडली. जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीयवादी, धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या ठिकाणी पारधी समाजाचे पवार कुटुंब राहतात. त्यांचा जमिनीवरून निंबाळकर कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे वाद चालू आहे.

निंबाळकर कुटुंबांनी यापूर्वीही तीन वेळा पारधी समाजाच्या लोकांवर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्याचा फायदा आरोपींनी घेतला आणि पवार कुटुंबीयांवर काल रात्री जीवघेणा हल्ला केला. पाठलाग करून त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले.

या हल्ल्यात बाबू पवार, प्रकाश पवार त्याची पत्नी जादुई पवार आणि संजय पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पारधी समाज हा लढाऊ समाज असून ब्रिटिशांविरुद्ध तो स्वतंत्र सैनिकासारखा लढला. मात्र, ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी जमात ठरवून त्यांच्यावर तसा शिक्का मारून ते निघून गेले. आजही त्यांच्यावर तो शिक्का कायम आहे. त्यामुळे पारधी समाजाची मानसिकता पूर्णपणे मोडण्यास कारणीभूत ठरली.

तरीही हा समाज आता नव्याने उभा राहतोय. सरकारी जमिनीवर स्वतःची उपजीविका करतोय. तो आता अभिमानाने जगायला लागला आहे ते इथल्या धर्मवादी, जातीयवादी समाजाला पाहवले नाही आणि म्हणून त्यांनी या चार निष्पाप लोकांची निर्घुन हत्या घडवून आणली. या पूर्वीही या समाजावर हल्ला करण्यात आला होता. त्याची दखल घेण्यात आली नाही.

निंबाळकर कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. उपसरपंचाला अटक करून सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.