Pune : टाटा मोटर्सकडून 300 किमी रेंज असलेली स्वदेशी इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात दाखल

एमपीसी न्यूज – संपूर्णतः भारतीय बनावटीची, अत्याधुनिक झिपट्रॅन तंत्रज्ञानावर आधारलेली, एका चार्जमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचे अंतर पार करणारी, अत्यंत वेगाने चार्ज होणारी, ० ते १०० किलोमीटर एवढी गती असलेली टाटा नेक्सान ईव्ही ही पूर्ण इलेक्ट्रिक कार आज टाटा मोटर्सने बाजारात दाखल केली.

ग्राहकांना ही कार जानेवारी २०२० मध्ये आरक्षित करता येईल. टाटा नेक्सान ईव्हीमधील बॅटरी आणि मोटरसाठी कंपनीने ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीपर्यंत गॅरंटी दिली आहे. या कारची किंमत १५ ते १७ लाख रुपयांपर्यंत असू शकेल.

याबाबत बोलताना गुंटेर बुशेक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक, टाटा मोटर्स, म्हणाले की झिपट्रान तंत्रज्ञान हे इलेक्ट्रिक कारमधील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानावर आधारित कारची निर्मिती करून टाटा मोटर्सने एक मैलाचा दगड निर्माण केला आहे. टाटा नेक्सान कारमुळे भारतीय ग्राहकांची या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. सुरक्षितता आणि शून्य पर्यावरण हानी ही या कारची वैशिष्ट्ये आहेत, असेही बुशेक यावेळी म्हणाले.

या गाडीची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की १२९ पीएस पर्मनंट मॅग्नेट एसी मोटर आणि अतिशय उच्च क्षमतेची ३०.२ केडब्लूएच लिथियम आयन बॅटरी असलेल्या ही गाडी ० ते १०० किमी प्रतितास अंतर फक्त ९.९ सेकंदांत जाते.

या कारमध्ये मध्यवर्ती ठिकाणी बॅटरीचे स्थान असल्याने या गाडीचा गुरुत्वमध्य अत्यंत उत्कृष्टरीत्या साधलेला असल्याने या कारला रस्त्यावर स्थिरता मिळते. या कारच्या चालकाने ब्रेक लावल्यानंतर बॅटरी चार्जिंग केली जाते, असे रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचे वैशिष्ट्य या कारमध्ये आहे.

भारतीय उष्ण वातावरणात बॅटरी थंड राहण्यासाठी लिक्विड कूल्ड केल्याने बॅटरीचे कार्य आणि आयुष्यही वाढते. या कारमध्ये एकूण ३५ मोबाईल अपबेस्ड फीचर्स असून रीमोट कमांड, व्हेईकल ट्रॅकिंग, ड्रायव्हिंग बीहेवियर अनेलिटिक्स, नेव्हिगेशन, रीमोट डायग्नोस्टिक्स अशी अत्याधुनिक वैशिष्ट्ये या कारमध्ये आहेत.

ही गाडी २१,००० रुपये भरून २० डिसेंबरपासून ग्राहकांना आरक्षित करता येईल, असे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like