Pune : महापालिकेत समाविष्ट 11 गावांत मिळकतींना कार्पेट एरियावर कर लावा -दिलीप बराटे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील सुमारे १ लाख ४२ हजार मिळकतींना महापालिकेकडून लावण्यात आलेला मिळकत कर हा बिल्टअप एरियावर लावण्यात आलेला आहे. तो कर कार्पेट एरियावर लावावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल दांगट, विकास दांगट, नवाज खान आदी उपस्थित होते.

महापालिकेने रेटेबल व्हॅल्यू ठरविताना ३० टक्के वजावट करणे आवश्यक होते. मात्र, 10 टक्केच वजावट होत आहे. त्यामुळे हा कर कमी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शिवणे येथील ग्रामस्थ आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांची बैठक विरोधी पक्षनेते बराटे यांच्या कार्यलयात झाली. सुमारे १ लाख ४२ हजार मिळकत धारकांच्या ग्रामपंचायतीकडे नोंदी झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या नोंदीमध्ये बिल्डरांनी बिल्टअप एरियानुसारच मिळकतींच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे ‘इंडेक्स टू’वर देखील तशाच नोंदी आहेत.

महापालिकेकडून मिळकतींच्या कार्पेट एरियावर कर आकारणी केली जाते. लघुउद्योजकांनी पत्रा शेड उभारलेले आहेत. दगडवीटांच्या बांधकामावर हे शेड्स उभे आहेत. मात्र, महापालिकेने या शेड्सनाही लोड-बेअरींगच्या बांधकामाचा दर लावून कर आकारणी केली आहे. त्यामुळे सामन्य माणसाचा रोजगार जाणार असल्याची भीती आहे. नऱ्हे, आंबेगाव, फुरसुंगी, शिवणे गावांतील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्ष भरापासून या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दांगट यांनी केला.

आधीच कधी नव्हे आशा मंदीचा सामना करावा लागत असल्याचे अतुल दांगट यांनी सांगितले. यामध्ये बदल करून कर कमी करण्याबाबत कानडे यांच्याशी चर्चा झाल्याचे बराटे म्हणाले. कानडे यांनी मिळकतधारकांनी वैयक्तिक अर्ज करावेत, अशी सूचना केली. त्यामुळे सर्वच नागरिकांना अर्ज करावे लागतील. दीड लाख अर्ज आल्यावर त्याची छाननी, पडताळणी करण्याएवढे मनुष्यबळ आणि यंत्रणा  कर संकलन विभागाकडे आहे का? असा प्रश्न बराटे यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.