Pune News : आत्मशोधाचा प्रवास यशाकडे घेऊन जातो : अभिनय कुंभार

एमपीसी न्यूज – “जीवनात अमर्याद संधी व अनेक वाटा असतात. त्या संधी, वाटांवर चालताना आपण आत्मशोधाचा प्रवास केला पाहिजे. (Pune News) त्यातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. यशापेक्षा पात्रता अंगिकारण्यावर आपण भर द्यायला हवा,” असे प्रतिपादन पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त अभिनय कुंभार यांनी केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने 16 व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोपावेळी अभिनय कुंभार बोलत होते. या अभ्यासक्रमात नरेंद्र शहाने प्रथम, अमिताभ भावे यांनी द्वितीय, तर मनीषा तापडिया यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

याप्रसंगी सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. मकरंद वाझल, जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. सुनील खुशलानी, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, उपाध्यक्ष ॲड. अमोल शहा, सचिव प्रसाद देशपांडे, खजिनदार ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिव ॲड. अनुरुद्र चव्हाण, अभ्यासक्रम चेअरमन मनोज चितळीकर, समन्वयक प्रणव सेठ, मिलिंद हेंद्रे, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, विलास अहेरकर आदी उपस्थित होते.

Chinchwad Bye-Election : चिंचवडमध्ये भाजपचे सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन

अभिनय कुंभार म्हणाले, “तज्ज्ञ सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्या मार्गदर्शनातून समर्पित भावनेने आपण ज्ञानार्जन करत आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जगण्याचे आयामही बदलले आहेत. स्पर्धा परीक्षा, बँकांच्या, विविध आर्थिक संस्थांच्या परीक्षा देत त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. (Pune News) तसेच सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवायला हवे.ॲड. सुनील खुशलानी म्हणाले की, उद्योग क्षेत्रात लेखापालांची, कर सल्लागारांची मोठी गरज आहे. कर कायदे, कर प्रणाली सातत्याने प्रगत होत आहे. सरकारकडून कर प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेसह नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. त्यामुळे या नव्या प्रणाली आत्मसात करायला हव्यात.

डॉ. मकरंद वाझल म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांना अशा अभ्यासक्रमाची संधी मिळायला हवी. करप्रणालीतील गुणवत्तापूर्ण शिक्षण ‘एमटीपीए’ देत आहे. असे अभ्यासक्रम शिकायला बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय करावी.”

श्रीपाद बेदरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मनोज चितळीकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रणव शेठ यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अमोल शहा यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.