Pune : देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

एमपीसी न्यूज – देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने आयोजित उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ आज (मंगळवारी) सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. एन. एस. उमराणी, शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, केंद्राचे सचिव धनंजय कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. देविदास वायदंडे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. सोनाली परचुरे यांना तर पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयास उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार देवून राज्यपाल श्री कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ‘इडूसर्च’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात चर्चा करताना नवे संशोधन आणि प्रशिक्षण यांची ज्याप्रमाणे आवश्यकता आहे त्याप्रमाणेच चांगला मानवी दृष्टीकोन निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे. शैक्षणिक क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे, देशाच्या उभारणीत नेतृत्व करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, कोणतेही काम छोटे नसते, प्रत्येक कार्यातून काही तरी चांगले निश्चितच घडत असते. शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राची सुरवात चार प्राध्यापकांनी केली, आज चारही दिशांना या संस्थेचे कार्य पोहचले आहे. शैक्षणिक व्याप्ती वाढल्याचे समाधान व्यक्त करून शिक्षण हा आपल्या आवडीचा विषय असल्याचे सांगत उत्तराखंड येथे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी देशात आहेत, यामध्ये तेथील शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, शिक्षकांच्या योगदानाने देशाचे उज्ज्वल भवितव्य घडेल, असा विश्वासही राज्यपाल श्री कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, देशातील उद्योग क्षेत्रात क्रांती झाली असून उद्योगांना अपेक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नवनवे अभ्यासक्रम, कौशल्य अभ्यासक्रम विकसित करण्याला विद्यापीठाचे प्राधान्य राहणार आहे. शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणासाठी शैक्षणिक विकास प्रशासन केंद्रार्च कार्य सुरू आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींच्या वतीने मॉडर्न महाविद्यालयाचे डॉ. गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी तर आभार केंद्राचे सचिव धनंजय कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.