Pune : उघड्या असलेल्या डीपीच्या झटक्याने साडेतीन वर्षाच्या बालकाने गमावले दोन्ही हात आणि पाय

एमपीसी न्यूज – गच्चीवर खेळताना महावितरणच्या डीपीशी संपर्क आल्याने एक साडेतीन वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले होते. या घटनेत उपचारादरम्यान बालकाला दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. ही दुर्घटना 18 एप्रिल रोजी सच्चाईमाता मंदिर परिसरात घडली. याचा मोठा धक्का बालकाच्या पालकांना बसला आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आयुष्यभर या मुलाचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्‍न त्यांना पडला आहे. महावितरणचा हलगर्जीपणा आणि घरमालकाच्या बेपर्वाई या घटनेला कारणीभूत ठरली.

आदि (वय साडेतीन वर्षे) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आदिचे वडील गणेश अनंता गायकवाड टेलरिंग काम करतात. एका भाड्याच्या घरामध्ये हे कुटुंब राहते. ते ज्या घरात रहातात तेथेच भिंतीलगत महावितरणचा डीपी आहे. हा डीपी उघडाच होता. घराच्या गच्चीचा संरक्षक कठडा फक्त दीड ते दोन फुटच उंच आहे. घटनेच्या दिवशी आदि हा गच्चीवर खेळत होता. खेळत असताना त्याचा चुकून महावितरणच्या डीपीला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून तो दूर फेकला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्‍टरांना त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागले.

आदींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरमालक आणि महावितरणचे तत्कालिन अधिकारी घटनेला जबाबदार आहेत. घरमालकाने इमारत महावितरणच्या डीपीला केवळ एक फुटाचे अंतर ठेवून बांधली आहे. बिल्डींगच्या गच्चीवरून एखाद्या व्यक्तीचा हात सहज डीपीपर्यंत पोहचू शकतो. इमारत बांधताना लोकांच्या जीवाची कोणतीच काळजी घेतली गेली नाही. तसेच महावितरणकडूनही इमारत बांधत असताना कोणतीही हरकत घेण्यात आली नाही.

आर्थिक मदतीचे आवाहन

गणेश गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात आदीवर उपचार करण्यासाठी 10 लाखाहून अधिक खर्च येणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन गणेश गायकवाड यांनी केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी 9604701644 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.