Pune : ‘त्या’ कामगाराचा मृत्यू ‘त्याच्याच’ हलगर्जीपणामुळे!; ‘पुणे मेट्रो’चे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – कामगाराचा तोल गेला आणि तो हायड्रा रोड क्रेनच्या रस्त्यावरून पळत गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण पुणे मेट्रोकडून देण्यात आले आहे. याबाबत मेट्रोकडून एका चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.

पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनच्या सहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे घडली. उमेश सिंग (वय 23 रा. नागपूर चाळ, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी क्रेन चालक जितेंद्र उमा प्रजापती (वय 30) याच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर मोबोज चौकात मेट्रोचे काम सुरू आहे. दिवसा गर्दी असल्यामुळे रात्रपाळीमध्ये काम करावे लागते. मंगळवारी पहाटे क्रेनच्या साहाय्याने प्लेट उचलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी उचललेली प्लेट घसरून खाली पडली. त्याखाली सापडून उमेश हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे.

यावर पुणे मेट्रोकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उमेश याचा काम करत असताना अचानक तोल गेला आणि तो हायड्रा क्रेनच्या रोडने पळत गेला. दरम्यान, क्रेनने एक स्टील प्लेट उचलली होती. ती खाली पडून त्यामध्ये उमेश जखमी झाला. त्यात ‘त्याचा’ मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे मेट्रोकडून देण्यात आले आहेत. यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती लवकरच आपला अहवाल पुणे मेट्रोकडे सादर करणार आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला देखील याप्रकरणी दंड आकारला असून सक्त ताकीद देण्यात आली असल्याचे पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.