BNR-HDR-TOP-Mobile

Pune : रेल्वेची 715 मीटर ओवरहेड वायर चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे मंडळात दौंड बारामती सेक्शन मध्ये विद्युतीकरणाची कामे करण्यात येत आहेत. काम सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी रेल्वेची 715 मीटर ओवरहेड वायर चोरून नेली. वायर चोरल्यामुळे 22 डिसेंबर रोजी रेल्वेच्या सेवेमध्ये बराच वेळ खंड पडला.

पुणे-दौंड रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. ओवरहेड वायरचे काम काम सुरू असल्याने त्यामध्ये विद्युतप्रवाह सुरु नव्हता. त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 715 मीटर वायर चोरून नेली. वायरचा काही भाग रेल्वे रुळावर पडलेला आढळून आला .यामुळे दौंड-बारामती पॅसेंजर रद्द करण्यात आली. तर एक मालगाडी बराच वेळ थांबवून ठेवण्यात आली. याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वायर चोरीच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या कामांवर प्रभाव पडत आहे. यात एखादी विद्युत प्रवाह सुरु असलेली वायर रेल्वेवर पडल्यास मोठा धोका होऊ शकतो. रेल्वेच्या ओवरहेड वायर मधून 2.2 केवी एवढा विद्युतप्रवाह सुरु असतो. त्यामुळे या वायरशी छेडछाड करणे अत्यंत धोकादायक असते. अशा प्रकारची जोखीम कोणीही पत्करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement