Pune : दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची सीबीआय कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी

सीबीआय तपासात नवीन मुद्दे नसल्याने न्यायालयाने दिले आदेश

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे न आल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पुरेशी कोठडी दिल्याचे सांगत न्यायालायने हे आदेश दिले.

आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे हे सीबीआय कोठडीत आहेत. त्यांची सीबीआय कोठडी संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

मात्र, सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे आले नसल्याने तसेच आरोपींच्या चौकशीसाठी पुरेशी सीबीआय कोठडी दिल्याचे सांगत विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. दरम्यान, आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या जमीन अर्जावर 7 जून रोजी सुनावणी होणार आहे.

  • पुनाळेकर याने यापूर्वी अटक आरोपींना पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. तसेच पुनाळेकर याच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्लेषण झालेले नाही.

त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट देखील अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्या दोघांना 14 दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.