Pune: खुद्द सहाय्यक आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

The Assistant Commissioner himself and his colleagues stayed up all night and cremated the woman who died in Corona.

एमपीसी न्यूज – धनकवडी परिसरात एका 65 वर्षीय महिलेचे मंगळवारी (दि. 21 जुलै) सायंकाळी 6 वा. कोरोनामुळे घरी निधन झाले. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने समयसूचकता दाखवून सातारा रोड – धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी पहाटे 5 पर्यंत जागे राहून संगमवाडी येथील कैलास स्मशानभूमीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

शनिवारी ( दि. 18 जुलै) या 65 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या महिलेच्या पतीचे गुरुवारी निधन झाले होते. घरातील सदस्यांची टेस्ट केली असता सर्वजण पॉझिटिव्ह आढळले. 2 मजले घर असल्याने त्यांना ‘होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री या महिलेला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यानंतर या महिलेला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, खर्च परवडत नसल्याने घरी आणले. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख

घरी मृत्यू झाल्याने हा या महिलेचा मृतदेह न्यायचा कोणी असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर सहाय्यक आयुक्त देशमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खूप ठिकाणी फोन केले, रात्री 11.30 पर्यंत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मग निलेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

रात्री 12.30 वाजता डॉ. भाकरे यांच्याशी संपर्क साधून डेथ सर्टिफिकेट मिळविले, गेट पास मिळविला. निलेश देशमुख, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, स्वॅब सेंटरच्या स्वच्छता ठेकेदाराचे 2 कर्मचारी, हे सर्वजण या महिलेच्या घरी पीपीई किट घालून गेले. एवढ्या रात्री महापालिकेची ऍम्ब्युलन्स काही मिळाली नाही. त्याला वारंवार संपर्क केला होता. तरीही संपर्क न झाल्याने वॉर्ड ऑफिसची ऍम्ब्युलन्स काढली. नंतर तो मृतदेह बॅगमध्ये ठेवला. प्लास्टिक अंथरूण मृतदेह ठेवला. घर पूर्ण फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या महिलेच्या घरातील सर्वच जण पॉझिटिव्ह असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही.

सहाय्यक आयुक्त, डीएसआय आणि ठेकेदाराच्या कामगारांनी कैलास स्मशानभूमी संगमवाडी येथे या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी पहाटे 5 पर्यंत हा अंत्यविधी सुरू होता. त्यावेळी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, आरोग्य निरीक्षक डॉ. नागमोडे, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, नरेंद्र भालेराव, आरोग्य निरीक्षक सोनवणे रात्रभर जागे होते. कोरोनामुळे सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे जे काही करावे लागेल, ते आता करावेच लागणार आहे. मृतदेह जरी उचलायची पाळी आली तरी मागे नाही हटायला पाहिजे, ते काम आम्ही केले, अशी प्रतिक्रिया निलेश देशमुख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.