Pune: ‘एसीबी ट्रॅप’च्या वेळी पळून गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकास अखेर अटक

एमपीसी न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचल्याचा संशय आल्याने उर्से टोलनाका येथून पळून गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अखेर एसीबीने अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सत्यजित रामचंद्र अधटराव असे आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 15 हजार रुपये स्वीकारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री सव्वा नऊ वाजता उर्से टोलनाका येथे घडली होती.

आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथकात महामार्ग पोलीस केंद्र वडगाव येथे कार्यरत आहे. तक्रारदार हे बाल रोडलाइन्स यांच्या हायड्रोलिक/ एक्सएल गाडीवर चालक आहेत. ते त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नई वरून राजकोटकडे जात होते. तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांचे अशी दोन वाहने आरोपी लोकसेवकाने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अडवून ठेवली. दोन्ही वाहने लॉकडाउन उठल्यानंतर (3 मे) नंतर सोडली जातील, असे आरोपीने तक्रारदार चालकाला सांगितले.दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे 10 हजार असे एकूण 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजता सापळा रचला. त्यावेळी आरोपीने 15 हजार रुपये लाच स्वीकारली. त्यानंतर आरोपी सहाय्यक निरीक्षकाला संशय आल्याने लाचेची रक्कम टेबलवर त्याने फेकून दिली आणि त्याच्या स्विफ्ट डिझायर (एम एच 42 / ए एच 1811) या कारमधून बेदरकारपणे पळून गेला.एसीबीने त्या सहाय्यक निरीक्षकाचा माग काढत त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.