Pune-प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी फोटोग्राफरची अजब शक्कल; भाड्याने घेतलेले 29 लाखांचे कॅमेरे जप्त

एमपीसी न्यूज – भाड्याने महागडे कॅमेरे घेऊन  ते कॅमेरे गहाण ठेऊन मिळालेल्या पैशाने प्रेयसीचे लाड पुरविणा-या फोटोग्राफरला फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून तब्बल 29 लाखांचे एकूण 10 महागडे कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत.

आकाश पांडूरंग भिसे (वय 22,रा.मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक शंकर कुंभार यांना बातमीदाराकडून लक्ष्मी रोड येथे एक तरूण महागडा कॅमेरा घेऊन थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन पोलीसांनी त्या तरूणास ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळील कॅमेरा चोरीचा असल्याचे समजले. त्यानंतर पोलीसांनी त्याची कसून चौकशी करून त्याच्याकडून तब्बल 26 लाख 60 हजार रूपये किंमतीचे कॅनन कंपनीचे 10 कॅमेरे आणि 8 लेन्स जप्त केल्या.

आकाश हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असून 4 महिन्यांपूर्वी त्याची एका मुलीशी मैत्री झाली. त्या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी आणि तिचे लाड पुरविण्यासाठी त्याला पैशांची कमी भासू लागली म्हणून त्याने त्याच्या फोटोग्राफीच्या व्यवसायाचा फायदा घेतला. त्याने एक शक्कल लढवली, त्यासाठी त्याने वेगवेगळ्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन त्याला फोटोग्राफीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या असल्याचे सांगून दीड हजार रूपये प्रती दिना प्रमाणे महागडे कॅमेरे भाड्याने घेतले. ते कॅमेरे तो इतर लोकांकडे गहाण ठेऊ लागला आणि मिळालेल्या पैशांमधून त्याने त्याच्या प्रेयसीला ऍक्टिव्ह गाडी, सोन्याच्या अंगठ्या, चैन घेऊन दिले. एवढेच नाही तर तो प्रेयसीला तसेच मित्रांना महागड्या हॉटेलमध्ये नेले. अशाप्रकारे मौजमजेसाठी त्यांनी लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी त्याच्यावर फरासखाना पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून कॅमेरांच्या मालकांचा शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त सुहास बावचे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलीस उप-निरिक्षक महेंद्र पाटील, पोलीस नाईक शंकर कुंभार ,पोलीस कर्मचारी बापुसाहेब खुटवड, केदार आढाव, विनायक शिंदे, अमोल सरडे, सयाजी चव्हाण, मोहन दळवी, विशाल चौगुले, विकास बो-हाडे, अमेय रसाळ, महावीर वलटे,आकाश वाल्मीकी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.