Pune : शहराला केंद्राकडून मिळणार 100 व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ : प्रकाश जावडेकर

The city will get 100 ventilators and medical staff from the center: Prakash Javadekar :केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत आज, मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

एमपीसी न्यूज – शहरातील आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेडची कमतरता पाहता लवकरात लवकर 100 व्हेंटिलेटर पुणे शहराला देण्यात येणार आहेत. त्यातील काही वेंटीलेटर टप्प्याटप्प्याने शहरात येण्यास सुरुवात होईल. तर काही वेंटिलेटर आज पुण्यात पोहोचतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत आज, मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महापौर मुरलीधर मोहोळ हेही या बैठकीत सहभागी झाले होते.

आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा स्टाफ लवकरात लवकर ससून आणि पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली.

कंटेन्मेंट झोनच्या बाबतीत अधिक कडक कारवाई झाली पाहिजे. वेळ पडली तर एसआरपीएफची मदत घ्यावी, अशी सूचनाही जावडेकर यांनी केली.

सध्याची परिस्थिती पाहता शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग वाढवण्यात यावा. पुणे महापालिकेने साडेचार महिन्यात कोरोनाच्या काळात अडीचशे कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला आहे.

परंतु, भविष्यात पुणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता केंद्रशासन व राज्य शासनाने पुणे शहराच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी महापौरांनी केली.

त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एकूणच राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात या बैठकीदरम्यान चांगला समन्वय राहिला.

‘गरजेच्या वेळी केंद्र सरकारने व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्यासंदर्भात पावले उचलल्याने पुण्याला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल.

सामूहिक प्रयत्नांना नक्कीच यश येईल आणि पुणे शहर या संकटातून बाहेर येईल, हा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.