Pune : ‘स्मार्ट फुटपाथ’ची संकल्पना सर्वत्र राबविणार -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मांडलेली आणि प्रत्यक्षात आणलेली ‘स्मार्ट फुटपाथ’ची संकल्पना स्तुत्य असून जेथे जेथे भाजपची सत्ता आहे, तेथे तेथे आपण असे फुटपाथ उभारण्यावर भर देऊ आणि जेथे सत्ता नाही तेथे असे फुटपाथ उभारा, अशी मागणी करू असे कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

मंजुश्री खर्डेकर यांच्या निधीतून ताथवडे उद्यान रस्ता तसेच समर्थ पथ या प्रभाग १३ मधील महत्त्वाच्या रस्त्यावरील पदपथ नव्याने करण्याच्या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.

मोठा फुटपाथ म्हणजे स्मार्ट फुटपाथ असे नव्हे तर ज्या फुटपाथवर नागरिकांना विनाअडथळा चालता येइल तो स्मार्ट फुटपाथ, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. प्रभागातील पदपथ पथारीवाले, फेरीवाले, स्टॉल हॉकर्स यांच्यापासून मुक्त असावेत, यासाठी सतत अतिक्रमण खात्याकडे पाठपुरावा करुन कारवाई करण्यास भाग पाडत असते. सोसायटी किंवा बंगल्यांच्या दारात पायऱ्या न करता स्लोप असावा जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडचण होणार नाही. झाडांच्या भोवती आळं करुन त्यालाही कट्टयाचे स्वरूप देणे आणि येथे बसण्यासाठी बाकडे बसविणे असे विविधांगी प्रयोग मी करत असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

जागरूक नागरिक आणि नगरसेवक यांच्या समन्वयातून आणि संवादातून प्रभागाचा विकास साधता येइल, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. जागरूक नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी मंजुश्री खर्डेकर व अन्य नगरसेवक तत्पर आहेत याचे समाधान वाटते असेही मोहोळ म्हणाले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका व कार्यक्रमाच्या संयोजक मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, मिताली सावळेकर, बापूसाहेब मेंगडे, बाळासाहेब धनवे, प्रशांत हरसुले, गौरी करंजकर ,सुवर्णा काकडे,संगीता शेवडे ,संगीता आदवडे, सुलभा जगताप , माणिक दीक्षित,अपर्णा लोणारे ,अमोल डांगे ,जाग्रुती कणेकर, रुपाली मगर, मंगल शिंदे, घाणेकर आजी, हेमंत भावे ,जगदीश डिंगरे ,कीर्ती गावडे ,रामदास गावडे, प्रमिला फाले, उपस्थित होते. यावेळी संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.