Pune : विभागात 1 लाख 36 हजार 148 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे विभागात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 1 लाख 36 हजार 148 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये ज्वारी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकारांना दिली.

शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढण्यात आला आहे. या विमा कंपन्यांनी ही भरपाई द्यावी. अन्यथा शासन शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे म्हैसेकर म्हणाले. येत्या 5 नोव्हेंबरच्या आत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहे. कारण, त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. साधारण 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

मागील वेळी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी 1 लाख 89 हजार 370 हेकटरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सुमारे 200 कोटी रुपये भरपाई देण्यात आली. पुणे विभागात आजपर्यंत सरासरी 137.24 टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 182.5 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात 158.5 टक्के, सातारा जिल्ह्यात 170.86 टक्के, सोलापूर जिल्ह्यात 91.75 टक्के, तर कोल्हापूर जिल्ह्यात 120.24 टक्के इतका पाऊस पडला आहे.

पुणे विभागात 58 तालुके असून 29 तालुक्यांत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.