Pune : पुुुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरूड परिसरात अज्ञाताने नऊ दुचाकी जाळल्या!

एमपीसी न्यूज – कोथरूड परिसरातील म्हातोबादरा येथे अज्ञात व्यक्तीने नऊ दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. म्हातोबानगर येथे रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या. यामध्ये नऊ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने म्हातोबानगर येथील रस्त्याच्या कडेला शेजारी-शेजारी लावलेल्या दुचाकींना आग लावली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत या आगीची झळ नऊ दुचाकींना बसली होती. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी येऊन जळालेल्या दुचाकींचा पंचनामा केला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकींना आग लावण्याचे प्रमाण वाढले आहे. कोथरूडमध्ये याआधीही असे प्रकार घडले आहेत. पोलिसांची गस्त सुरू असतानाही समाजकंटकांकडून असे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.