Pune : अग्निशमन जवानाने वेळीच मदत केल्याने टळला मोठा अनर्थ

एमपीसी न्यूज – अग्निशमन जवानाने वेळते जाऊन मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरगुती सिलेंडरने अचानक पेट घेतल्यामुळे मोठी हानी झाली असती परंतु घरी असताना देखील सुदैवाने तांडेल राजाराम केदारी यांनी वेळीच मदत केली.

ही घटना आज बुधवारी (दि.30) सकाळी 9च्या सुमारास लोहगाव येथील राठोड निवास येथे घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजता लोहगाव येथे राठोड निवास याठिकाणी घरगुती सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असून मदतीची मागणी करणारा फोन दलाच्या नियंत्रण कक्षात आला. दरम्यान, सिलेंडरने घरात पेट घेतल्याचे गांभीर्य पाहून दलाकडून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.

तसेच येरवडा येथील सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड यांना कळवून लोहगाव येथे राहात असलेले दलाचे तांडेल राजाराम केदारी यांना ही ते जवळच राहात असल्याने कळविण्यात आले.

जवान केदारी यांची दुपारी ड्युटी असल्याने ते घरीच होते. घटना कळताच त्यांनी तातडीने आगीच्या ठिकाणी धाव घेतली. राठोड निवास येथे पोहोचताच त्यांना घरगुती सिलेंडर स्वयंपाक खोलीत आगीच्या ज्वाळांमध्येच दिसला. घरातील लोकांनी भितीने सिलेंडर शेगडीसकट घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.

आगीने रौद्र रुप धारण केलेल्या सिलेंडरवर काही ब्लँकेट, चादरही टाकले. पण काही उपयोग झाला नाही. जवान केदारी यांनी शिताफीने एका लोखंडी पट्टीने प्रथम पेटत्या सिलेंडरवरचे चादर काढून त्या सिलेंडरवर ओल्या कपड्याने एकच झपका देत आग कमी करत सिलेंडर रेग्युलटर पासून वेगळा करत बाहेर अंगणात आणला. जवान केदारी यांनी दाखविलेले कौशल्य व केवळ पाचच मिनिटात आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने मोठी हानी टळली.

आग विझताच तिथे अग्निशमन अधिकारी रमेश गांगड आणि दलाचे जवान ही पोहोचले. परंतू, तांडेल राजाराम केदारी यांनी बजाविलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुकच केले. तसेच राठोड निवासमधील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.