Pune : उलगडली सागरलाटांच्या रक्षणकर्त्यांची गौरवगाथा

एमपीसी न्यूज – देशाला लाभलेल्या विस्तीर्ण सागरसीमांचे (Pune)रक्षण करण्यास कटिबद्ध असणाऱ्या भारतीय नौदलाची अभिमानास्पद गौरवगाथा रविवारी पुणेकरांचा ठाव घेणारी ठरली. प्राचीन संस्कृतींपासूनचा नौकानयन, सागरी व्यापार, आरमार, बंदरे, गोदी, बोटी, जहाजांची बांधणी, त्यांच्यावरील सुसज्ज व्यवस्था…असा अनोखा इतिहास रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी आणि कमोडोर दोराईबाबू यांनी उलगडला.

निमित्त होते पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी(Pune) संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये सादर झालेल्या ‘गाथा भारतीय नौदलाची’ या कार्यक्रमाचे

सदर कार्यक्रम विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आवारात संपन्न झाला. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे, रणजीत नाईकनवरे, डॉ .सविता केळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Pune :’ससून’च्या अधिष्ठात्यांवर कठोर कारवाई करावी

यावेळी बोलताना रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी म्हणाले, “नौकानयन आणि जलवाहतूक तसेच सागरी व्यापाराचे उल्लेख ऋग्वेदापासून आढळतात. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून पुरातत्त्वीय पुरावेही आज उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांना नौसेना, नौदलाचे महत्त्व ठाऊक होते. मध्ययुगात मात्र सागरांकडे दुर्लक्ष झाले. ते पुन्हा प्रस्थापित केले, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. परकीय मंडळी आरमाराच्या बाबतीत अधिक सरस आणि अद्ययावत आहेत, हे शिवरायांनी जाणले आणि आरमाराची, जलदुर्गांची उभारणी केली.”

देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर आपले भारतीय नौदल टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले. आपण सातत्याने नौदलाचे आधुनिकीकरण, सक्षमीकरण करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भरतेचा मंत्र आपल्यासमोर आहे. आपण आता जहाजे विकत घेणारे नसून, अन्य देश आपल्याकडून जहाजे घेतात, ही गोष्ट अभिमानास्पद आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.

आपण देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात अग्रेसर आहोत. नौदलाला आवश्यक ती प्रत्येक गोष्ट देशातच उत्कृष्ट दर्जाची आपण उत्पादित करत आहोत. नौदलासाठी सातत्याने नवी जहाजे, बोटी, लढाऊ विमानवाहू बोटी, पाणबुड्या, आण्विक पाणबुड्यांची बांधणी केली जात आहे. आगामी काळात आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

कमाडोर दोराईबाबू यांनी नॅशनल मेरिटाईम हेरीटेज काॅम्प्लेक्स (राष्ट्रीय समुद्री विरासत परिसर) या निर्माणाधीन प्रकल्पाची माहिती आपल्या सादरीकरणात दिली. गुजरातमधील लोथल या जगप्रसिद्ध पुरातन डाॅकयार्ड परिसरात ३७५ एकर विस्तीर्ण परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. सुमारे 4 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रगतीपथावर आहे. दोन प्रमुख विभागात एकूण 14 गॅलरींच्या माध्यमातून हडप्पाकालीन सागर संस्कृतीपासून आजच्या अत्याधुनिक नौदलापर्यंतचा प्रवास या प्रकल्पातून मांडला जाणार आहे. जगातील सर्वांत उंच लाईटहाऊस या प्रकल्पात उभारले जाईल. पर्यटकांना जलमार्गानेच हा प्रकल्प अनुभवता येईल.

यानंतर मोहन शेटे यांनी ‘शिवरायांच्या जलदुर्गांच्या कथा’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल, त्यांच्या दूरदृष्टीबद्दल, त्यांनी उभारलेल्या जलदुर्गांबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

कथायात्रेच्या पाचव्या पर्वाचा समारोप बॉम्बे इंजिनीअरींग गृपच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी त्यांनी ‘कहाणी लष्कराच्या बँडची’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये लेफ्टनंट कर्नल रोशन चव्हाण यांनी प्रास्ताविक करीत बँडचा इतिहास आणि आजवर बँडने केलेली कामगिरी यांची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर संपूर्ण बँडने स्वातंत्र्यवीर सावरकर रचीत ‘जयोस्तुते’ या धून ने कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी रेनेसान्स या गीताची धून, मेरा मुल्क मेरा देश ही चित्रपटाची धून वाजविली

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा असलेल्या या बँडचा उद्देश हा केवळ मनोरंजन किंवा संगीत हा नसून संवाद आणि मनोबल वाढविणे हा असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. यावेळी सादर झालेल्या लष्करी बँडच्या काही विशेष धून ऐकत पुणेकरांनी अभिमानाने टाळ्यांचा गडगडाट केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.