Pune : आंबील ओढ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना शासनानेही मदत करावी -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – आंबील ओढ्याला पूर येऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. पुणे महापालिकेने सुमारे 281 कोटींचा आराखडा तयार केला आहे. या नाल्यालगतची अनधिकृत बांधकामे तातडीने काढण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने महाराष्ट्र शासनाने मदत करावी. त्यासंदर्भात प्रशासनाला पाठपुरावा करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती महापौरांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महिनाभरापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत आंबील ओढ्याची पाहणी केली होती. त्यांनतर बुधवारी महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, सभागृह नेते धिरज घाटे यावेळी उपस्थित होते.

भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी कोणत्या उपाययोजना करायचा यावर बैठकीत चर्चा झाली. टांगेवाले कॉलनी, सहकार नगर, दांडेकर पूल, सिंहगड रोड भागात पूर आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नागरिकांना 15 हजार नुकसान भरपाई देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण, अद्यापही केवळ 5 हजार रुपयेच मदत मिळाली.

10 हजार रुपये मदत मिळाली नाही. त्यासंदर्भात महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. नाल्यालगतची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. लोकांचे पुनर्वसन त्याच भागात करण्याची सूचना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.