BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एक लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून साडेपाच कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे मंडळाकडून विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर तसेच अन्य गैरवर्तन करणा-या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणा-या 1 लाख 1 हजार 732 फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 5 कोटी 69 लाख रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई एप्रिल ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे मंडळातील पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज, मिरज ते कोल्हापूर या भागात रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 2 लाख 28 हजार प्रकरणांमध्ये 11 कोटी 20 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 1 लाख 1 हजार 732 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले आहे.

मागील वर्षी या कालावधीमध्ये एकूण 1 लाख 96 हजार 503 प्रकरणे समोर आली. त्यामध्ये 10 कोटी 44 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. ही कारवाई पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अप्पर रेल्वे मंडळ व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाचे वरिष्ठ मंडळ व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली करण्यात आली. ही कारवाई यापुढे देखील नियमितपणे सुरु राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोफत प्रवास करण्याच्या भानगडीत न पडता तिकीट घेऊन प्रवास करावा. अन्यथा अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वे अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3