Pune : विविध क्षेत्रातील 21 कतृत्ववान महिलांचा ‘राही कदम प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – डॉ. शं.ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे यंदाचा राही कदम प्रेरणा पुरस्कार नवी पेठ येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना प्रदान करण्यात आला. यंदा समितीने सातारा, कराड, वाई, कोल्हापूर, सांगली, गुळंब तसेच मुंबई,पुणे येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या २१ महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाताई पाटील यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला.

या प्रसंगी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. गिरीजा भास्कर शिंदे तसेच ईरा तावरे, मीरा पवार, संघमित्रा खेडेकर, हर्षवर्धन कदम,राजवर्धन कदम, समीरन पवार, हनुमंतराव तावरे, विकास खेडेकर, भास्कर राव शिंदे, प्रतीक भगत आदि उपस्थित होते.

सैनिकांच्या पत्नीसाठी कार्यरत असणार्या मनीषा दीपक, माध्यम व्यवस्थापन आणि विपणनच्या करुणा पाटील, न्यूट्रिशनिस्ट अवंती देशपांडे, सीआयडी स्नेहल संदीप भापकर , गायनाकॉलॉजिस्ट डॉ.नीना खैरमोडे, पत्रकार सोनाली शिंदे, स्वच्छता अभियानासाठी काम करणार्या रेशू अग्रवाल, शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रतिमा गायकवाड, गीतकार,कीर्तनकार निवेदिता मेहंदळे, पर्यावरणासाठी काम करणार्या सविता काजरेकर, सामाजिक कार्यकर्ता स्वाती पिसाळ, कृतिशील शिक्षिका सुनिता काटम, उत्कृष्ट गाईड कॅप्टन पुरस्कार रुक्मिणी घोलप, डब्ल्यू मार्टच्या संस्थापिका सुजाता मेघाने, ज्वेलरी डिझायनर अनिता क्षीरसागर, डे केअर मनीषा सुंदर, कोठारी ऑरगॅनिकच्या संस्थापिका योगिता कोठारी, नृत्यांगना अजिजा, एसआरपीएफ जवान श्रीमती घाडगे यांना यंदाच्या राही कदम प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी उपस्थित 95 वर्षाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाताई पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण कॅप्टन प्रमिला चव्हाण, अभिनेत्री मॉडेल रोशनी कपूर, समुपदेशक सोनाली राव, आणि उद्योजिका रचना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाल्या, आज समाजामध्ये शंभर टक्के स्त्री पुरुष समानता आली तर महिलांसाठी असे विशेष दिवस साजरे करण्याची आवश्यकता राहणार नाही. चव्हाण यांची जडणघडण ग्रामीण भागातून झाली असल्याने त्यांचा पायलट होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता पण चिकाटी, धैर्य आणि आत्मविश्वास त्याच्या जोरावर त्यांनी हा खडतर प्रवास पार पाडल्याचे नमूद केले.

आज कोणते ही असे क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला अग्रेसर नाहीत अगदी बॉडीबिल्डिंग सारख्या क्षेत्रातही विविध वयोगटात महिला उत्तम कामगिरी करताना दिसतात ही खूप समाधानकारक गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजया पवार आणि आर जे निसर्ग यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1