Pune : विरोध करणारी मानसिकता लोकशाहीसाठी जिवंत ठेवली पाहिजे -यशवंत सिन्हा

कोथरुड येथे गांधी स्मारक निधी येथील व्याख्यानाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – विरोध करणारी मानसिकता लोकशाहीसाठी जिवंत ठेवली पाहिजे. अन्यथा लोकशाही आणि तिचे भवितव्य धोक्यात येईल, असा इशारा यशवंत सिन्हा यांनी दिला. युवक क्रांती दल आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गांधी स्मारक निधी कोथरुड येथे सोमवारी (दि. 23 सप्टेंबर) हा कार्यक्रम झाला.

यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले, आता विरोधी मत मांडणे हे देशविरोधी मानले जाते. मला इमानदारीचा मार्ग पकडायचा असल्याने पक्षीय राजकारण सोडले. भयमुक्त होऊन बोलायला लिहायला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण यांच्या मार्गाने आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. हा सत्याचा रस्ता आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही विरोध करतो. काश्मीरमध्ये ‘मार्शल लॉ’सारखे वातावरण आहे. मलाही तिथे जाऊ दिले नाही. मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत आणि सर्व देशात आनंदाचे वातावरण झाल्याचे सांगण्यात आले. भारताच्या संविधानाच्या गोष्टी काश्मीरमध्ये डावलण्यात आले.

दररोज सर्जीकल स्ट्राईक होत आहेत. सर्जिकल स्ट्राईक हे प्रशासनाचे मॉडेल होऊ शकत नाही. गांधीजी आणि जयप्रकाश नारायण यांच्या मार्गाने जावे लागेल. मी अजून दहा वर्षांनी तरुण असतो तर आणखी काही चळवळ केली असती. मी न्यायव्यवस्थेच्या बाबतीतही अपेक्षा ठेवत नाही. कारण, आजचे सर्वोच्च न्यायालय देखील दबावाखाली आहे.

विरोधी पक्षांकडून काश्मिरबाबत स्पष्ट भूमिका घेतली गेली नाही. कार्पोरेट टॅक्स रद्द करून उद्योग क्षेत्रातील मुठभरांचे भले करण्यात आले. सामान्यांचे त्यात काय भले झाले? पण, आपण आता प्रश्नच विचारायचे विसरलो आहोत. तरुण जागृत झाले तर कोणी रोखू शकणार नाही. कृषी उत्पन्न दुप्पट करणार होते, त्याचे काय झाले? त्याचप्रमाणे आकड्यांची हेराफेरी करून 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था ते उभे करतील.

भाजपमध्ये जितक्या वेगाने पक्षांतर करून गेलेत. ते राजकारणाचे अवमूल्यनच आहे. जे पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेत. ते परिस्थिती बदलल्यावर परत मूळ पक्षात परतणारच नाहीत, असेही नाही.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, देशाच्या महत्वाच्या काळात सिन्हा यांनी न्यायाची भूमिका घेतली. त्यांचे निर्णय परराष्ट्र धोरणात महत्वाचे ठरले. अशी माणसे अजूनही भारतात आहेत, ते आशेचे किरण आहेत. आता देशात हिटलर जन्माला येत असेल तर त्याला जन्माला घालणारी कूस, समाज दोषी ठरतो. इतर देशाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणारा भारतीय पंतप्रधान आपण पाहिला नव्हता. लोकशाही संस्थांचे इतके अवमूल्यन केले आहे, की पुढे कोणालाही ही व्यवस्था चालवणे कठीण आहे. गांधी भवनच लोकशाहीवादी व्यक्ती आणि चळवळींना आश्रय स्थान ठरणार आहे. गांधी विचार पुन्हा प्रत्येक भारतीय मनात जन्म घेईल, यात शंका नाही.

यावेळी नीलिमा सिन्हा, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे, प्रशांत गावंडे, नागेश भोसले इत्यादी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.