Pune : कविता जितक्या जास्त वाचू, तेवढ्या जास्त लिहिता येतील -माधवी घारपुरे

एमपीसी न्यूज – कथा लिहिताना टिपण खूप महत्त्वाचे असते. इतर लेखकांच्या कविता वाचल्या पाहिजे. कविता जितक्या जास्त वाचू, तेवढ्या जास्त लिहिता येईल, असे गुपित श्वास चित्रपटाच्या लेखिका आणि प्रसिद्ध कथाकार माधवी घारपुरे यांनी उलगडले.

पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शब्दब्रह्म राज्यस्तरीय कथा व कविता लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कै. श्रीमती गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र ईशान्यनगरी शेजारी वारजे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत लेखकांनी 48 कथा व 75 कवितांचा सहभाग नोंदवला. निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. विजेत्यांना माधवी घारपुरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक अन्नताचा प्रवासी धर्मराज माहुलकर यांना (औरंगाबाद), दुसरा क्रमांक पालवी तृप्ती बाळ यांना (पुणे), तिसरा क्रमांक, शरद पुराणिक यांना (नाशिक), उतेजनार्थ ऊन सावली, श्वेता सुनील कुलकर्णी (पुणे) व लोचनबाय अंकुश गजरे, पंढरपूर (शेवाळे गाव) यांना बक्षीस देण्यात आले. कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक कवी भरारी महेश कुलकर्णी (पुणे) यांना, दुसरा क्रमांक लगावली स्वाती यादव (पुणे) यांना, तिसरा क्रमांक माहेरचा पारिजात अमृता देशपांडे (नागपूर) यांना, तर उत्तेजनार्थ जात म्हणजे पाल आहे, विजय शेंडगे, (पुणे) यांना, अक्षय दिप, शतनू कुलकर्णी, (अमेरिका) यांना बक्षीस देण्यात आले.

यावेळी पुणे महापालिका शिक्षक मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नागरसेविका दीपाली धुमाळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य, सचिव डी. के. जोशी, निवृत्ती येनपुरे, ज्योत्स्ना चांदगुडे, उदय कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, संगिता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, जयंत मोहिते, सुरेश जाधव, साधना कुलकर्णी, शरद जतकर यावेळी उपस्थित होते. मागील 3 महिन्यांपूर्वी कथा व कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा, असे बाबा धुमाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.

तसेच, वारजे परिसरात नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याचे बाबा धुमाळ आणि डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. वृंदाताई दिवाण आणि धनंजय तळवलकर यांनी कथा व कवितांचे परीक्षण केले. साधना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी निवेदन केले. महेश कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा व परीक्षक परिचय करून दिला. सर्व सहभागी स्पर्धकांना लवकरच प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.

माधवी घारपुरे म्हणाल्या, कथेसाठी नाट्य पाहिजे पण, नाटक नको. स्पष्ट, शुद्ध बोलता आले पाहिजे. साहित्य संमेलन घेता येईल. त्यामध्ये परिसंवाद, कथा, कविता घेता येईल. जोपर्यंत आईला बाळ आणि झाडाला फुले येत आहेत, तोपर्यंत सदभावना संपलेली नाही. जगात मूठभर लोक चांगले आहेत, म्हणून जग चाललेय. यावेळी घारपुरे यांनी कथाकथन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच, मला वरजेकर म्हटल्याचा आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.