Pune : सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका घरोघरी जाणार होती, त्याचे काय झाले? -नितीन कदम

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पुणे महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार होते, त्याचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी या आजाराचा धसका घेतला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यु जाहीर करत पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला.

एवढेच काय पण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सुद्धा हा ‘जनता कर्फ्यू’ पाळत वेगळा आदर्श घालून दिला. परंतु, संध्याकाळी ज्यावेळी थाळी नाद करायचा होता तेव्हा मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच गर्दी जमवली.

डॉ. नायडू रुग्णालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना गुलाब दिले. गुलाब देण्याची कृती चांगली असली तरी तेथे सोशल डिस्टनसिंगला हरताळ फासला गेला. सर्व जण एकत्र आल्याने उद्देश बाजूला पडला. वास्तविक रात्री नऊ वाजता हा कर्फ्यु संपणार होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वारंवार आवाहन केले आहे. लॉक डाऊन सँदर्भात आवश्यक सूचना दररोज देत आहेत. तरीही महापौरांनी त्याचे गांभीर्य ठेवले नाही. आता थेट पंतप्रधानांनीच 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. महापौरांनी निदान त्याचा मान ठेवावा. आपण शहराचे प्रथम नागरिक आहात. नागरिक आपले अनुकरण करणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या. काळजी वाढवू नका.

पुणे महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याची घोषणा केली होती. त्याकडे महापौरांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही नितीन कदम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.