Pune: कोरोनाची सद्यस्थिती पाहता चाचण्यांचे प्रमाण पाचपटीने वाढविण्याची गरज, तज्ज्ञांचे मत

Pune: The need to increase corona tests to be Five times, experts say अनेक रूग्ण गंभीर लक्षण घेऊन रूग्णालयात दाखल होतात, त्यांचा रिपोर्ट येण्यास विलंब होतो. या रूग्णांना औषधे देण्याची गरज असते.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता, चाचण्यांचे प्रमाण पाचपटीने वाढविण्याची गरज असून, त्याद्वारे बाधित रूग्णांचा शोध घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांवर सक्षम अधिकाऱ्यांची त्वरित नेमणूक करावी. शहरातील वैद्यकीय यंत्रणांचे प्रश्‍न समजून घेत त्यावर तोडगा काढण्याची आणि साथनियंत्रण कार्यात नागरिकांनाही सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित कृतीगट स्थापन करण्यासंदर्भत राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने गोपाळ तिवारी यांच्या पुढाकारातुन “वार्तालाप सहकार्याचा’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी शिवसेना आमदार नीलम गोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रमूख डॉ. अविनाश भोंडवे माजी सनदी अधिकारी महेश झगडे, राष्ट्रवादीचे रवींद्र माळवदकर, शिक्षण तज्ज्ञ पी ए ईनामदार, पुणे सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, डॉ. अभिजित मोरे, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे आयसीयू विभागप्रमुख डॉ. प्रसाद राजहंस, रूबी हॉस्पिटलचे संजय पठारे, लॅप्रोस्कॉपी सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. भोंडवे म्हणाले, आज नागरिकांसमोर सर्वांत मोठा प्रश्‍न उद्भवत आहे, तो म्हणजे बेडसची उपलब्धता. अनेकदा डॅशबोर्ड अपडेट नसतो, अशी तक्रार नागरिक करतात. त्यासाठी सर्व माहितीयुक्त असा ऍप बनवून त्याद्वारे नागरिकांना योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी.

अनेक रूग्ण गंभीर लक्षण घेऊन रूग्णालयात दाखल होतात, त्यांचा रिपोर्ट येण्यास विलंब होतो. या रूग्णांना औषधे देण्याची गरज असते. मात्र, मेडिकल व्यावसायिकांकडून कोविडचा रिपोर्ट मागितला जातो. हा नियम रद्द करण्याची गरज आहे.

महेश झगडे म्हणाले, महामारी नियंत्रण ही वैद्यकीय नव्हे, तर प्रशासकीय जबाबदारी आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच या कार्यात नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

यापुढील काळात महापालिकेने नागरिकांना समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यासाठी साथीच्या रोगांचा एक दीर्घ अनुभव आहे. येथील यंत्रणेकडे त्याबाबत आवश्‍यक साधनसामुग्री आहे.

त्यामुळे पुण्यात साथ नियंत्रण हे अधिक प्रभावीपणे होणे आवश्‍यक आहे. मात्र दुर्दैवाने तसे झाले नसल्याने आज पुण्यात या साथीचा प्रभाव सर्वाधिक आहे.

रूग्ण आणि नागरिकांचे समुपदेशन हा मोठा भाग यामध्ये आहे. एकीकडे प्रचंड भिती आणि दुसरीकडे बेफिकीरी अशा टोकाच्या प्रवृत्तीचे लोक दिसून येतात. यासंदर्भात जनजागृती होणे गरजचे आहे.

ऑडियो-व्हिज्युअल या दृकश्राव्य माध्यमातून याबाबत जनजागृती केल्यास त्याचा अधिक फायदा होईल, असे मत डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले.

उगाचच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक मोठ्याप्रमाणात आहे. अशा नागरिकांबाबत काय करायचे? हाही एक मोठ प्रश्‍न प्रशासनासमोर असून, त्याबाबत काम होणे गरजेचे असल्याचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ तिवारी यांनी केले तर रवींद्र माळवदकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.