Pune : खंडणीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – अपहरण करून कोयत्याचा धाक दाखवून एकाला चार जणांनी मिळून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यासह अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

अजिंक्य उत्तम कांबळे (वय 25, रा. सहकार नगर, टिळेकरवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल खेडेकर (रा. उरुळी कांचन) यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना आरोपी आणि त्याच्या ती साथीदारांनी पळवून नेले. कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.

खेडेकर यांनी घाबरून दीड लाख रुपयांची खंडणी दिली व आपला जीव वाचवला. खंडणीमध्ये ठरल्याप्रमाणे इतर रक्कम बाकी असल्याने आरोपी अजिंक्य कांबळे याने खेडेकर यांस पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच उरलेली रक्कम न दिल्यास लहान मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत खेडेकर यांनी रविवारी (दि. 5) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपी कांबळे याच्यावर यवत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील यवत पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात आरोपी फरार होता. आरोपी कांबळे याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस कर्मचारी विजय कांचन, लियाकत मुजावर, गुरू जाधव, धीरज जाधव, सुधीर अहिवळे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.