Pune: ‘त्या तिघी’ कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोग १ मे रोजी 

सावरकर घराण्यातील वीरांगनांची शौर्यगाथा रंगमंचावर 

एमपीसी न्यूज- सावरकर घराण्यातील बंधू त्रयींच्या पत्नींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मांडणाऱ्या ‘त्या तिघी’ या डॉ. सौ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी… स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हा एकपात्री प्रयोग ‘अभिव्यक्त, पुणे’ या संस्थेतर्फे १ मे रोजी रंगमंचावर येत आहे. 

सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे सायंकाळी ७ वाजता हा प्रयोग होणार आहे. संकल्पना व संहिता लेखन अपर्णा चोथे यांचे असून सावरकर घराण्यातील  यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर, शांताबाई नारायण सावरकर या तिन्ही व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. दिग्दर्शन अजिंक्य भोसले यांचे असून संगीत अजित विसपुते यांनी केले आहे. नेपथ्य आणि वेशभूषा अश्विनी चोथे-जोशी यांचे आहे, तर प्रकाशयोजना संकेत पारखे आणि स्थिरचित्रण चैतन्य कुलकर्णी यांनी केले आहे.
  • सावरकर बंधूंचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे. पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या स्त्रिया कशा जगल्या? कष्टभरली आयुष्य अनेकींच्या वाट्याला येतात, पण आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचं हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. अशा, आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या वीरांगनांची शौर्यगाथा या एकपात्री प्रयोगाद्वारे रंगमंचावर येत आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.