pune : मानवजातीच्या रक्षणासाठी अध्यात्माची गरज ; पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मत

एमपीसी न्यूज : विज्ञानाने आज अतुलनीय भरारी घेतली आहे. माणसाच्या दैनदिन जीवनासाठी त्याने अनेक सुविधा उत्पन्न केल्या आहेत. पण याच विज्ञानाची वाढत जाणारी प्रगती ही विनाशकारी बनत चालली आहे. म्हणून मानवजातीच्या रक्षणासाठी तिला अध्यात्माच्या आधारे नियंत्रित करणे आवश्यक आहे.असे मत जगविख्यात संगणक तज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त केले.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड हे होते. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.चंद्रकांत पांडव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी एमआयटी आर्ट,डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु.कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा कराड नागरे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.शरदचंद्र दराडे-पाटील,व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा.डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के क्षीरसागर हे उपस्थित होते.

डॉ.विजय भटकर म्हणाले,“आज संपूर्ण जग हे शांतीच्या शोधात आहे.भौतिक जगात नेत्रदीपक प्रगती होऊनसुद्धा लोक सुखी नाहीत. ही मोठी आश्‍चर्याची गोष्ट आहे.खरे सुख हे अध्यात्माच्या मार्गात दडलेले आहे.भारतीय ने महाकुंभमेळ्यासारखे उत्सव निर्माण केले आहेत. संपूर्ण जगातून त्या ठिकाणी कोट्यवधी लोक गोळा होतात.सर्व लोकांना भक्तीच्या धाग्याने बांधून ठेवण्यासाठी या गोष्टीला सुध्दा महत्व आहे. समृध्दी आणि शांती एकाच वेळी प्राप्त करण्यासाठी पूर्व आणि पश्‍चिम गोलार्धांचा संगम झाला पाहिजे.

आज वैद्यकीय शास्त्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तन आले आहे. बायो इंजिनियरिंग इ. सारखे आजचे अनेक महत्वाचे विषय आहेत. परंतू तत्त्वज्ञान हे सर्वात महत्वाचे आहे.आय फोन हे केवळ इंजिनियरिंग नाही, तर ती एक सुंदर कला आहे. त्याचे डिझाइन हेही महत्वाचे आहे. तसेच मानवजातीच्या कल्याणासाठीचे विचार महत्वाचे आहेत.ज्ञानेश्‍वरी, गाथा,एकनाथी भागवद हे खरे ज्ञानाचे भांडार आहे.”

प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“या शतकाच्या शेवटी मानवजात शिल्लक असेल का, अशी शंका उत्पन्न होत आहे. त्याचेच उत्तर शोधण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय झाला पाहिजे. स्वामी विवेकांनद यांच्या म्हनण्यानुसार २१व्या शतकात भारत हे ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. देशाला जाती धर्माचा जो शाप लागला आहे त्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी अध्यात्म आणि मानवतेची गरज आहे.”

डॉ.चंद्रकांत पांडव म्हणाले,“ मानवता, उदारता आणि लीनता या तीन गोष्टींचा ज्यात समाविष्ट झाला आहे, त्यालाच माऊली असे म्हणतात. ते खर्‍या अर्थान एक सामजिक परिवर्तनकार होते. त्यांनी विश्‍वशांतीसाठी महान कार्य केले आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी भींत चालविली, म्हणजे मृतप्राय समाजाला जागृत केले. रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक दिली, असे होय. या सृष्टिमध्ये प्राणी आणि मानव यांच्यामध्ये एकच चैतन्य आहे.”

डॉ. मंगेश तु कराड म्हणाले,“ या मंगलमय प्रसंगी व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश हा प्राध्यापकांच्या ज्ञानात भर घालणे हा आहे. प्रत्येकाच्या जीवनात आह्वाने आहेतच त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होते. १९९६ पासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत ४०० पेक्षा अधिक वक्त्यांनी आपली मार्गदर्शनपर भाषणे केली आहेत.”

डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.प्रा.प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.