Pune : पुणे विद्यापीठाच्या शिल्लक लेखी परीक्षा जुलैमध्ये होणार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन परिक्षेसाठी येणाऱ्या अडचणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या शिल्लक परिक्षा आॅनलाईन घ्यायच्या का आॅफलाईन या प्रकरणी गेल्या एक आठवड्यापासून चर्चा सुरु होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे वेळापत्रक कोलमडले. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आणि ‘युजीसी’ने उपकुलपती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

या समिती आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार, शेवटच्या वर्षाच्या शेवटची सहामाही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षा कमी वेळात पूर्ण करण्यासाठी प्रश्न पत्रिकेचा नमूना सुद्धा बदलण्यात येणार आहे.

दरम्यान, या परीक्षेच्या वेळेची मर्यादा आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता परिक्षा आॅनलाईनच घेतली जावी, अशी मागणी केली जात होती.

मात्र, विद्यार्थी संघटनेने या निर्णयाला विरोध केला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता परीक्षा पारंपारिक पद्धतीने घेण्याचा आग्रह धरला आहे. पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सहामाहीसाठी जवळपास 2 लाख 46 हजार विद्यार्थी बसले आहेत.

पुणे जिल्ह्यातील बहुतेक महाविद्यालयात आॅनलाईन परीक्षेची सुविधा आहे. पण अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात संगणक आणि आॅनलाईन परीक्षेची पुरेसी सुविधा उपलब्ध नाही. तसेच आॅनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षा विभागाचे प्रमुख डाॅ. अरविंद शाळिग्राम यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यापीठाने परीक्षा लेखी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असून कुठल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा आॅनलाईन होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला काही विषयात नापास झाले आहेत त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाणार असून 50% अंतर्गत आणि 50% विद्यापीठ परीक्षेवर त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक आणि प्रयोग यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेवटच्या वर्षा व्यतिरिक्त अन्य सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश दिला जाणार असून फक्त मागे राहिलेेल्या विषयांची परिक्षा त्यांना पास करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.