मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022

Pune : महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर शाखेने केले महिलेचे जट निर्मूलन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचे (Pune) कार्यकर्ते एकनाथ पाठक यांच्या ओळखीने पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी दत्तवाडी परिसरातील गायकवाड या महिलेचे जट निर्मूलन केले. एकनाथजी हे अनेक दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होते. वेळ ठरवून शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले. माधुरी अष्टेकर, परिक्रमा खोत, मयुर पटारे व एकनाथ पाठक या कार्यकर्त्यांनी जटनिर्मूलन केले.

सुरूवातीला कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या जटांबद्दल माहिती जाणून घेतली. अनेक दिवसांपासून त्यांना त्रास होत होता, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. तसेच त्यांच्या घरातील इतर सदस्यही त्यांच्या त्रासाबद्दल बोलले. त्यांच्या घरातून जटा निर्मूलनासाठी सपोर्ट होताच. त्या स्वत: त्रासामूळे निर्मूलनासाठी तयार होत्या. अजूनही जटांसंबंधी सारख्या अनेक गोष्टींनी असंख्य लोकं अंधश्रद्धेने ग्रासलेली आहेत, पण गायकवाड कुटुंबातील सुधारकी विचारांच्या प्रभावाने हे जट निर्मूलन सहज साध्य झाले. असे असले तरी त्यांच्या मनात एक दडपण निर्माण होती. सर्व कार्यकर्त्यांनी समुपदेशन करताना त्यांना मनातून खंबीर केले. अंनिस एक कुटुंब म्हणून तुमच्यासोबत आहे, असा विश्वास त्यांना दिला. मग त्या लगेच तयार झाल्या.

YCMH: वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष सुरू करा – लक्ष्मण जगताप

त्यांनी कित्येक वेळेस जट निर्मूलनसाठी बाहेर लोकांशी व ब्युटी पार्लरशी (Pune) संपर्क सुद्धा केला होता, पण त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणी भेटले नाही. साहजिकच समाजात असणाऱ्या ह्या अनिष्ट प्रथेचा संबंध हे देवाचं वगैरे आहे, असे त्यांच्या आजूबाजूचे लोक बोलत होते. त्यानंतर त्यांनी स्वतः घरगुती उपचार म्हणून काही प्रयत्न सुद्धा केले. जट सोडवण्याचा प्रयत्न केला. हे ही त्या ताईंनी सांगितले. पण त्यातही त्यांना यश आले नाही. मात्र शिवाजीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि जटेच्या अनिष्ट प्रथेतून मुक्त व्हावे यासाठी प्रबोधन केले. त्या व त्यांच्या घरातील सदस्य जट कापायची आहे यासाठी तयार असल्याने प्रत्यक्ष जट निर्मूलनास सुरुवात केली. माधुरी अष्टेकर व परिक्रमा खोत यांनी ताईंचे केस कापण्यास सुरुवात केली.

मयूर पठारे यांनी मदत केली. जटेच्या प्रत्येक ठिकाणी पाणी फिरवून सहज केस कापण्यास मदत केली. अनेक दिवसांपासून गायकवाड ताई अनिष्ट प्रथेत अडकून होत्या. आज त्यातून त्यांची मुक्तता झाली. चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. आम्ही सर्वजण निघतो, असे म्हणताच काकूंनी व त्यांच्या घरच्यांनी आम्हाला चहा आग्रहाने आणून दिला. त्यावेळी आम्ही अंनिस शिवाजीनगर शाखेच्या उपक्रमांची माहिती दिली, ते ऐकून त्यांच्या कुटुंबाने शाखेशी जोडून घेण्याचे व कार्यक्रमास येण्याचे ठरविले आहे. असे कुणी जट असल्याचे आढळल्यास ते नक्की शाखेला सांगणार आहेत.

Latest news
Related news