Pune: कोरोना नियंत्रणात राज्य शासन गंभीर नाही, पालिकेला केवळ 3 कोटी रुपये दिले- जगदीश मुळीक

Pune: The state government is not serious in controlling Corona, only Rs 3 crore was given to the municipality says Jagdish Mulik पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च होत असताना, राज्य शासन याबाबत गंभीर नसून, महापालिकेला केवळ 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण, वैद्यकीय चाचण्या, स्वॅब तपासण्या, अँटीजन किटचा वापर, कोव्हिड सेंटरची निर्मिती, क्वारंटाइन सेंटरवरील सुविधा, रुग्णालयांतील सुविधा, व्हेंटिलेटर, पीपीई किट, शिधावाटप आणि जनजागृती अशी कोरोना नियंत्रणासाठी लागणारा खर्च महापालिका करीत आहेत. तसेच दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठीचा खर्चही महापालिकेला करावा लागत आहे.

या सर्व कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ 3 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

महापालिकेचा आजपर्यंत झालेला खर्च, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.

मुळीक म्हणाले, राज्य शासनाने निधीचे वितरण करताना महापालिकेच्या वर्गवारीचा निकष न लावता उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा विचार करावा.

पुणे शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 34 हजार 40 इतकी असून, 21 हजार 107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 हजार 16 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.