Pune : पटरीवर शौचास जाणा-यांनो ! रेल्वे प्रशासनाची तुमच्यावर नजर आहे

एमपीसी न्यूज – हागणदारीमुक्त झालेल्या महाराष्ट्रात खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर अजूनही लोक शौचालयाचा वापर करत नाहीत. शहरात ज्या भागात रेल्वेमार्ग आहे, त्या भागातील नागरिक रेल्वे पटरीचा उपयोग शौचालयासाठी करतात. रेल्वे प्रशासनाने अशा पटरीवर शौचालयाला जाणा-या पटरी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पटरीवर शौचास जाणा-यांवर रेल्वे प्रशासनाची करडी नजर असणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाजवळ संगम ब्रिज ते शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, हडपसर, पुणे ते सासवड या भागात मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्गाच्या आसपासच्या भागातील नागरिक रेल्वे पटरीवर शौचास जात असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पटरीबहद्दरांविरोधात रेल्वे प्रशासनाने एक अभियान सुरू केले आहे. रेल्वे रुळांवर शौच केल्यामुळे दुर्गंधीसह रूळ गंजून खराब होत आहेत. मार्गावरील खडी इतरत्र पसरत आहे. या दुर्गंधीमुळे रेल्वेच्या कर्मचा-यांना देखील काम करताना अडचणी येत आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने रेल्वे रुळांवर होत असलेल्या दुर्गंधीवर उपाय करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत आहे. त्यात महाराष्ट्र राज्याच्या हागणदारीमुक्त असल्याचा दावा केला आहे. त्यात अशा प्रकारे दुर्गंधी पसरत असल्याने राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाची आणि नागरिकांची देखील जबाबदारी वाढत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांवर शौचास जाणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा पटरीबहद्दरांकडून 500 रुपयांचा दंड देखील वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शौचालयांचा वापर करून रेल्वे रुळांवर स्वच्छता ठेवण्याचे आवाहन पुणे रेल्वे मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.