Pune: राष्ट्रवादीच्या पाठीशी कामगारांची ताकद उभी करणार -महेश शिंदे

अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रवादी'मध्ये जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज -“शरद पवार, अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांसाठी, गरिबांच्या न्यायासाठी झटणारे नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची कदर करणारा नेताच देश चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून शरद पवार यांनी डॉ. आंबेडकरांविषयी असलेला आदर दाखवून दिला होता. त्यामुळे महाराष्ट्राला आणि देशाच्या विकासाला न्याय देण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे कामगारांची ताकद उभी करणार आहे,” असे प्रतिपादन कामगार नेते महेश शिंदे यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशभाऊ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार ऍड. वंदनाताई चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, ऍड. जयदेव गायकवाड, बापूसाहेब पाठारे यांच्या उपस्थितीत कामगार आघाडीचे पदाधिकारी अनिल मोरे, प्रदीप कांबळे, अरुण जगताप, संदेश साळवे, रामभाऊ कर्वे, गौतम माने, बापू शिंदे, उनवणे ताई यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी सन्मानाने महेशभाऊ शिंदे व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

  • यावेळी बोलताना महेश शिंदे म्हणाले, “पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आणि भाजप-सेनेकडून होत असलेली रामदास आठवले आणि कार्यकर्त्यांची ससेहोलपट पाहून रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडलो. राष्ट्रवादी पक्षात सगळीच माणसे जिव्हाळ्याने वागत आहेत. आज खऱ्या अर्थाने माणसात आलो आहे. सध्याचे सरकार मनुवादी विचारांनी प्रेरित असून, तोंडात एक आणि पोटात एक अशा पद्धतीने वागत समाजात जातीयवाद पेरण्याचे काम करीत आहे.

अशा जातीयवादी लोकांना दूर सारून गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार आणणार आहोत. आदरणीय नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी राज्यभर फिरून काम करणार आहे. २७ जिल्ह्यातील गावागावांत असलेला कामगार राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.