Pune : विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे : तुषार गांधी

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘निर्भय बनो अभियान’चे प्रवर्तक डॉ.विश्वंभर चौधरी (Pune)यांच्यावर सिन्नर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार सायंकाळी साडे पाच वाजता गांधी भवन ,कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. वैचारिक दहशतवादाविरोधात लढण्याचा(Pune) निर्धार या सभेत करण्यात आला. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.विश्वंभर चौधरी,एड.असीम सरोदे यांनी या सभेत मार्गदर्शन केले.युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

आनंद करंदीकर,संदीप बर्वे, अप्पा अनारसे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया,वर्षा शेडगे, अरूण खोरे,डॉ अभिजीत मोरे, दीपक ओव्हाळ, नीलम पंडीत, ऍड. राजेश तोंडे, प्रिया नेमाने, रोहन गायकवाड, दीपक मोहिते, विवेक काशीकर,राहुल तरकसे आदी मान्यवर उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले, ‘ सिन्नरचा हल्ला म्हणजे विश्वंभर चौधरी यांना जणू शौर्याची पोचपावती मिळाली आहे. आम्हाला लाज वाटली पाहिजे की समोरची हिंसेचे समर्थक मंडळी हल्ले करीत असताना आपले मनोबल पडत आहे. ते घाबरवतात , धमकी देतात आणि मग गोळी चालवतात. त्यांची विचारधारा हिंसेची आहे. अहिंसा रूपी कवच करून आपल्याला आता उभे राहावे लागेल. हे एक युध्द् आहे आणि ते अजून तीव्र होणार आहे. आपल्याला शांती सेना उभी करावी लागेल. विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे आहे.विचारांची लढाई धारदार करावी लागेल. आपल्या देशाला वाचवायचे असेल तर आपल्याला कुर्बानी द्यावी लागेल.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्म एकदा अंगात भिनला कि ते एक विष होते. म्हणून आपला विवेक जिवंत राहिला पाहिजे. लोकांना बोलू द्यायचे नाही याचे प्रयत्न चालू आहेत . सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर लोक जायला लागले की सत्ताधाऱ्यांची तडफड सुरू होते. 2024 मधे लोकसभा निवडणूका जाहिर होतील. आतापासून 4 महिने आपण जोमाने काम केले पाहिजे. विवेकवाद जिंकवला पाहिजे.निर्भय बनो अभियान’ अजून मोठं केलं पाहिजे. ‘


डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘सिन्नरच्या घटनेतून आपण बरेच काही शिकलो आहे , आमच्या बाबतीत या आधी असे काही झालं नव्हते . पुढचा काळ हा खूप सावध राहण्याचा आहे. मी हिंदूचा द्वेष करत नाही . पण संघाच्या हिंदूत्वाविरोधात मी आहे. नथुरामचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. सिन्नर मधे मोठी सभा घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) , काँग्रेस , राष्ट्रवादी ,लोकशाहीवादी संस्थांचा मी आभारी आहे.

या सर्वानी खूप पाठिंबा दिला. सिन्नरच्या घटनेनंतर 14 जिल्हयांमधुन सभांसाठी निमंत्रण आले आहे. आता दुप्पट वेगाने ‘निर्भय बनो अभियान’ राबविणार आहे. वारकऱ्यांमधे धारकरी पाठवणे आम्हाला मान्य नाही. मी आणि माझा राम यात दलालाची गरज नाही.सर्व धर्म आमचे आहेत’.

Punavale : पुनावळे येथील कचरा डेपो विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखळी उपोषणाला आयटीयन्सचा पाठींबा

एड.असीम सरोदे म्हणाले, ‘डॉ.विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे.हा हल्ला म्हणजे विषारी हिंदूचा विचारी हिंदूवर केलेला हल्ला आहे. त्यांच्या विचारसरणीवर आपण हल्ला केला पाहीजे. हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर सिन्नर मधे मोठी सभा घेतली पाहिजे.

सभेचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर म्हणाले , ‘युवक क्रांती दल हे विश्वंभर चौधरी यांच्या सोबत कायम राहील. शांती सेना उभी करून कायम सहकार्य करतील. अहिंसक नागरिकांची शक्ती उभी करून कायम सहकार्य केले जाईल.’

विवेक काशीकर यांनी प्रास्तविक केले.रोहन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अप्पा अनारसे यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.