Pune : पिंपरीतील चोरट्याचा पुण्यात येऊन धुमाकूळ; घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस

The thief from Pimpri came to Pune and made a fuss; Eight burglary cases uncovered : पल्सर दुचाकी आणि रोख रक्कम असा साठ हजाराचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही लॉकडाऊन काळात शहरात येऊन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना चतुशृंगी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले.

विकास उर्फ जंगल्या उर्फ विकी दिलीप कांबळे (वय 28, रा. बौद्ध नगर, पिंपरी) आणि सरफराज उर्फ रावण ताद शेख (रा.कासारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहे.

त्यातील विकास उर्फ जंगल याला पिंपरी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाउनच्या काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क घातलेले, टोपी परिधान केलेले चोरटे दिसत होते. परंतु, त्यांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या.

दरम्यान या चोऱ्यांचा तपास करणाऱ्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना कांबळे आणि शेख या चोरट्यांनी औंध परिसरात घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील घरकुल वसाहतींमधून या दोन्ही आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी घरफोड्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पल्सर दुचाकी आणि रोख रक्कम असा साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, लुटमार, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही पिंपरी आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.