Pune : वंचितांचे छत्र हरपले; भीषण अपघातात सेवाभावी सुदामकाकांसमवेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : सुदामकाका नावाने प्रसिद्ध असलेले सुदाम भोंडवे (Pune) आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांचा मंगळवारी दुपारी शिरुरजवळ भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-नगर रस्त्यावर शिरूरमधील कारेगावजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरला त्यांची कार धडकली. हा अपघात इतका मोठा होता, की या कुटुंबातील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुदाम शंकर भोंडवे (वय 66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय 60), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय 32) आणि आनंदी अश्विन भोंडवे (वय 4 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील रहिवासी आहेत. या अपघातात कार चालवत असलेला अश्विन सुदाम भोंडवे (वय 35) हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ सेवाभावी सुदाम काका –

एका ज्येष्ठ सेवाभावी कार्यकर्त्याचा असा मृत्यू अतिशय वेदनादायक आहे. बीड जिल्ह्यातील सोनदरा (ता. पाटोदा) इथे उपेक्षित वंचित मुलांसाठी सुदाम भोंडवे यांनी गुरुकुल उभारले. स्व. नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दीनदयाळ शोध संस्थानचा हा प्रकल्प.

त्यांनी आईच्या मायेने या सर्व मुलांचा सांभाळ केला. त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांना मदतीसाठी समाजातून अनेक हात पुढे आले.

पुढे सुदाम काकांनी सोनदरा गुरुकुल (Pune) मोठे केले. वर्धिनीचाही विस्तार झाला. परंतु, आज त्यांच्या जाण्याने वर्धिनी परिवार अनाथ झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनरखाली घुसलेली कार बाहेर काढली. त्यानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर काढून वाहतूक पूर्ववत केली.

पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेता म्हणून निवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.