Pune : विधानसभेसाठी ‘वंचित बहुजन आघाडी’कडून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार शेख आणि मिलींद काची रिंगणात

महाराष्ट्रातील २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; यादीत विविध समाजातील उमेदवारांना स्थान

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील मतदारसंघातून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार शेख आणि मिलींद काची हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.नुकतीच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात त्यांनी विविध समाजातील उमेदवारांना स्थान दिले आहे, हेच विशेष बाब मानली जात आहे. या वंचित बहुजन आघाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत, असेच राजकीय वर्तुळातून समजत आहे.

गेल्या 70 वर्षात महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांनी प्रथमपासून जातीचे आणि नंतर कुटुंबशाहीचे राजकारण केले. बहुजन, कारागीर, उद्योजक, अलुतेदार, बलुतेदार जातींना महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारणापासून बेदखल ठेवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकास, धोरणात प्रचंड प्रादेशिक सामाजिक असमतोल व शोषण निर्माण झाले. याचे दुष्परिणाम म्हणून आज बेकारी, शेतकरी आत्महत्या, गरीबी, ओला व सुका दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनता बेजार झाली आहे.

ही कुटुंबशाही आणि एका जातीच्या थैलीशहांच्या भ्रष्ट राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढून इथल्या राज्यकारभारात लोकशाही व समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. हे आव्हान स्वीकारून महाराष्ट्रातील मागील लोकसभा निवडणूकीत निवडणूक प्रक्रियेमध्ये सामाजिक लोकशाही आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अतिशय अभिनव व धाडसी पाऊल टकले.

गेल्या 70 वर्षात ज्यांना संधीपासून वंचित ठेवले अशा अलुतेदार, बलुतेदार, कारागीर अल्प लोकसंख्या असलेल्या समाजातील गरीब असले तरी गुणवान असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली याचा सामाजिक परिणाम झाला.

या उद्योजक आणि कारागीर समाजाची आजपर्यंत कोंडून ठेवलेली प्रचंड ऊर्जा महाराष्ट्राच्या समाजकारणात मोकळी होत आहे. विविध सामाजिक गटातील सौहार्द व बंधुभाव वाढला आहे. राजकीय आकांक्षा जागृत होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रदेशात मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भेटताना याचा अनुभव आला.

उद्योजक जाती या नेहमीच त्यांच्या व्यवसाय व्यवहाराची आवश्यकता म्हणून नव्या व आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाची कास धरतात. महाराष्ट्रात या जातींचा अनुभव, ज्ञान, बुद्धीमत्ता व समजदारी चा उपयोग महाराष्ट्राची विकास धोरणे आखण्यासाठी केला पाहिजे, महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक समस्यांवर उपाय योजना करून विकासाला समतेची नवी दिशा देणारा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीतील गुणवान कार्यकर्त्यांच्या टीमने तयार केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पुन्हा या वंचित समूहातील दुर्बल अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार, बलुतेदाराना रिंगणात उतरवणार आहे. या समाजातील उमेदवारांची पहिली यादी त्यांच्या समाजाची (जातींच्या ऐवजी समाज असा शब्द प्रयोग केला पाहिजे) नोंद करून आम्ही आज प्रसारित करत आहोत.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून राज्यातील सर्व वंचित समाजांना यात स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात विविध भागांत जाहीर सभा झाल्या व त्या सभांना प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले असून विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी प्रस्थापितांना तगडं आव्हान उभे करणार, अशी चिन्हे राज्यात दिसत आहेत.

 • राज्यातील उमेदवारांची (पहिली) यादी: नावे पुढीलप्रमाणे :-
  (नाव) (मतदारसंघ) (जात/समाज)
  1. सुरेश जाधव, शिराळा – रामोशी
  2. डॉ. आनंद गुरव, करवीर – गुरव
  3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर – गोंधळी
  4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण – लोहार
  5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव – नंदिवाले
  6. दीपक शामदिरे, कोथरुड – कैकाडी
  7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर – वडार
  8. मिलिंद काची, कसबा पेठ – काची-राजपूत
  9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी – छप्परबंद, मुस्लीम
  10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर – तांबोळी
  11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव – पारधी
  12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड , कोल्हाटी
  13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा – सोनार
  14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी – ढीवर
  15. अरविंद सांडेकर – चिमूर, माना आदिवासी
  16. माधव कोहळे – राळेगाव, गोवारी
  17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव, – पटवे-मुस्लिम
  18. लालसू नागोटी – अहेरी, माडीया आदिवासी
  19. मणियार राजासाब – लातूर शहर, मणियार
  20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी, भोई
  21. अड आमोद बावने – वरोरा, ढीवर
  22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव, भिल्ल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.