Pune : कचऱ्यावरून फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांनी महापालिकेला सुनावले!; कचरा टाकला तर आंदोलन करणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा टाकू द्यावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाने ग्रामस्थांना केली. मग, आमच्या भागात कोरोना नाही का?, अशा शब्दांत ग्रामस्थांनी महापालिकेला सुनावले. पुणे महापालिकेत गुरुवारी बैठक आयोजित केली होती.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यावेळी उपस्थित होते. मागील 17 दिवसांपासून ग्रामस्थांचे कचरा न टाकू देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यावर आजही तोडगा निघू शकला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

उरुळी देवाची गावांतील 14 लोकांना महापालिकेत नोकरी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण, हे आश्वासन पाळण्यात आले नाही. महापालिकेत मनमानी पध्दतीने कारभार सुरू असल्याचा आरोप, नगरसेवक गणेश ढोरे यांनी केला. 200 मेट्रीक टन कचरा प्रकल्प आणण्यात येत आहे.

ग्रामस्थांना चांगला पाणीपुरवठा करा, ग्रामपंचायत असताना 10 कोटी रुपये विकासासाठी निधी मिळायचा. आता केवळ 3 ते 4 कोटी रुपये दिले जात आहेत. गावांची लोकसंख्या जास्त आहे. नवीन टॅक्स लावण्यात आला आहे. मात्र, विकासकामे काही होत नाही. त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती, असेही त्यांनी सांगितले.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांत मागील 30 वर्षे झाले कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे सोसायटीच्या धर्तीवर 10 टक्के सवलत द्यावी, गावांचा टॅक्स माफ करण्यात यावा, हॉस्पिटल उभारण्यात यावे, आशा अनेक मागण्या ग्रामस्थांनी केल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रकल्प बंद करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना विकासकामे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, महापालिकेने ते पाळले नाही. विकास आराखडा बाबत महापालिकेने दिलेले पत्र ग्रामस्थांना दाखवू, त्यानंतर आंदोलन मागे घ्यायचे का ते ठरवू, असे डॉ. बाळासाहेब हरपळे म्हणाले. फुरसुंगी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रणजित रासकर, किशोर पोकळे, धनंजय कामठे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.