Pune : जास्तीचे व्याज आकारून पैसे परत न दिल्यास महिलेस जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील आणखी व्याजाची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी रेश्मा प्रशांत खामकर (वय 28, रा.बिबवेवाडी) आणि उमेश सुरेश खिरीड (वय 33, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी धायरी येथे राहणा-या एका 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने रेश्मा आणि  उमेश यांच्याकडून 7 टक्के व्याजाने 1 लाख रूपये घेतले होते. त्यानुसार फिर्यादीने देखील त्याबदल्यात 1 लाख 73 हजार 900 रूपये परत केले आहेत. परंतु ती रक्कम परत देऊन देखील रेश्मा यांनी फिर्यादीला 1 लाखावर 10 टक्के प्रमाणे दरमहा 10 हजार रूपये मागण्यास सुरूवात केली. एवढेच नाही तर त्या महिलेने फिर्यादीचे बॅंक ऑफ बडोदाचे पासबुक आणि चेकबुक घेऊन को-या चेकवर आणि पैसे काढण्याच्या स्लिपवर फिर्यादीच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्याचबरोबर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने काढून घेतले. अशाप्रकारे फिर्यादीला आणखी 7 लाख रूपये मागत असून ते न दिल्यास त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.