Pune : जन्म – मृत्यू विभागाचे काम आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून चालणार : महापौर

The work of birth and death department will now be carried out from every field office, informed Mayor Murlidhar Mohol.

एमपीसी न्यूज – जन्म – मृत्यू विभागाचे काम आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून चालणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोविड – 19 कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये महापालिकेला राज्य शासनाच्या मार्गदर्शक बाबींनुसार विशिष्ट प्रमाणातच सेवकवर्ग ठेवणे बंधनकारक आहे.

अपुरा सेवकवर्ग असल्याने जन्म – मृत्यू विभागाकडून प्रमाणपत्र देण्यास विलंब होत होता. तशा प्रकारच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते. जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सध्याच्या प्रचलित नियमानुसार 24 दिवसांचा कालावधी लागतो. आरोग्य विभाग, सांख्यिकी, संगणक विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये यांनी याकामी आवश्यक समनव्य साधून हा कालावधी कमी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

त्यामुळे नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध होऊन गैरसोय कमी होणार आहे. दिनांक 16 जूनपासून आरोग्य विभागा मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 आरोग्य अधिकारी देण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

हे आरोग्य अधिकारी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळणाऱ्या सर्व वार्तांचे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात डाटा एन्ट्री काम करणार आहेत.

त्यामुळे आता जे काम फक्त कसबा – पेठेतील जन्म – मृत्यू कार्यालयात चालते ते प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात येणार आहे.

सध्या मिळकतकर विभागाचे सेवक दाखले देण्याचे काम करीत आहेत.

दि. 15 जूनपर्यंत तातडीची व्यवस्था करण्यासाठी सांख्यिकी आणि संगणक विभागाने उद्यापासून क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 संगणक ऑपरेटर उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य अधिकारी राहुल जगताप, सांख्यिकी व संगणक प्रमुख माधव देशपांडे, विजय दहीभाते, सुरेश जगताप, नितीन उदास, जयंत भोसेकर, डॉ. कल्पना बळीवंत उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.