Pune : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एक हजार जणांची नोंदच नाही; महापौरांची मुख्यमंत्र्यांसमोर खळबळजनक माहिती

There is no record of a thousand deaths from corona; Sensational information of the mayor to the Chief Minister : ससून रुग्णालयात दररोज सरासरी बारा मृत्यू होत असल्याचेही महापौरांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सुमारे एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदच करण्यात आली नाही, अशी खळबळजनक माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर दिली. ससून रुग्णालयात दररोज सरासरी बारा मृत्यू होत असल्याचेही महापौरांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे काल, गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित बैठकीत महापौरांनी खाजगी रुग्णालय संदर्भात अनेक गंभीर आरोप केले.

ससून रुग्णालयात दररोज सरासरी बारा मृत्यू होत असल्याचेही महापौरांनी सांगितले. यावेळी महापौर म्हणाले, पुण्यातील कोरोना बळींची संख्या ही सध्याच्या संख्येच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे.

पुण्यात भेट दिलेल्या केंद्रीय समितीच्या पथकाने याबाबतचा निष्कर्ष काढला आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दाखल झाल्यानंतर लगेचच मृत्यू झालेल्या व्यक्तींचे एक्स-रे काढले आहेत.

मृतांच्या फुफ्फुसांमध्ये दिसणारे डाग, त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करणारे आहेत. खाजगी रुग्णालये व ससूनच्या संख्येचा विचार करता पुण्यात सुमारे एक हजार मृत्यू करोनामुळे झाले आहेत.

मात्र, चाचणी न झाल्याने हे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समोर आले नाही, असेही महापौर म्हणाले.

‘आयसीएमआर’च्या सूचनांनुसार अशा मृतदेहांची चाचणी करण्यात येत नाही. त्यामुळे हे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे उघडकीस आलेले नाही. या मृतदेहांमुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही.

त्यामुळे राज्य शासनाने याची चौकशी करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महापौर काय म्हणाले…

#  ससून रुग्णालयात दररोज रोज 12 मूत्यू कोरोनाव्यतिरिक्त होत आहेत, ही संख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महिन्याला 50  ते 100 असून ढोबळपणे अधिक 400 ते 500 मृत्यू कोरोनाचे असतात, पण ते आकडेवारीत दर्शविले जात नाहीत.

# टेस्ट न होता हे मृत्यू होत आहेत.  यात काही मृत्यू हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी झालेले आहेत.

# छातीच्या एक्स-रे काढल्यानंतर अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.

# याबाबत सविस्तर चौकशी करुन भविष्यातील अशा मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.